विकासाचे मुद्दे नसल्याने भाजप सैरभैर : अशोक चव्हाण

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला भरमसाठ आश्‍वासने देऊन सत्तेवर आले. त्यांनी 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले, पण जनतेचा स्वप्नभंग त्यांनी केला आहे. जनतेच्या जगण्याच्या समस्या आणि अडचणी उलट वाढल्या. त्यांच्याविषयीची नाराजी मतपेटीतून व्यक्त होईल - अशोक चव्हाण
विकासाचे मुद्दे नसल्याने भाजप सैरभैर : अशोक चव्हाण

नांदेड : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला भरमसाठ आश्‍वासने देऊन सत्तेवर आले. त्यांनी 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले, पण जनतेचा स्वप्नभंग त्यांनी केला आहे. जनतेच्या जगण्याच्या समस्या आणि अडचणी उलट वाढल्या. त्यांच्याविषयीची नाराजी मतपेटीतून व्यक्त होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 'सकाळ'चे प्रतिनिधी दयानंद माने यांच्याशी चर्चेदरम्यान व्यक्त केला. चव्हाण यांनी कॉंग्रेस आघाडीची वाटचाल, मतदारांचा प्रतिसाद यावर चर्चा केली, त्याचा गोषवारा-

प्रश्‍न : 2014 च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांची लाट होती. यंदाच्या निवडणुकीत कोणाची लाट आहे?
उत्तर : गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या सरकारने इथल्या शेतकरी, महिला, दलित, अल्पसंख्याक या वर्गाची अक्षरशः वाट लावली आहे. लोकांना 'अच्छे दिन'चे स्वप्न त्यांनी दाखविले. मात्र या सरकारची कामगिरी अत्यंत दयनीय राहिली. त्यामुळे सर्वसामान्य मतदार या पाच वर्षांच्या काळात अक्षरशः नागवला गेला आहे. त्यामुळे या वेळी 2014 सारखी लाट तर नाहीच नाही, उलट या वर्गात सुप्त अशी नाराजीची लाट आहे. ती मतपेटीतून व्यक्त होईल. ही नाराजीची लाटच या सरकारला उद्‌ध्वस्त करेल. मोदी सरकारने पाच वर्षांत विकास न केल्यामुळे त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाहीत.

प्रश्‍न : कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीला किती जागा मिळतील, असे वाटते?
उत्तर : देशभरामध्ये कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीने सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आम्ही प्रचंड विश्‍वासाने निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे देशात आणि राज्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीला चांगले यश प्राप्त होईल. मात्र नेमक्‍या किती जागा निवडून येतील, ते आज सांगता येणार नाही. पहिल्या टप्प्यात राज्यात झालेल्या मतदानात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, हे खरे.

प्रश्‍न : प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचे स्टार प्रचारक असूनही तुम्हा नांदेड मतदारसंघातच अडकून पडलाय, असे वाटत नाही का?
उत्तर : तसे काहीही नाही. उलट मला असे म्हणणे चूक वाटते. आमचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वर्धा, पुणे येथील सभांना मी हजेरी लावली. मधल्या काळात उमेदवारी ठरविण्याच्या प्रक्रियेसाठी मी सातत्याने दिल्ली आणि मुंबई येथे जात-येत होतो. माझी स्वतःची उमेदवारी नांदेडमधून असल्याने मी त्यासाठी वेळ देणे सहज स्वाभाविक आहे. मी पूर्ण ताकदीनिशी लढतो आहे. गेल्या वेळी 80 हजारांनी, तर यंदा त्यापेक्षा दुप्पट मतांनी विजयी होणार आहे. माझ्या मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान आहे. ते पार पडल्यानंतर मी प्रचारासाठी राज्यभर जाणार आहे.

प्रश्‍न : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षातून डॉ. सुजय विखे, अब्दुल सत्तार यांच्यासारखी मंडळी बाहेर पडली. अनेक मतदारसंघांत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निवडीचा घोळ सुरू होता. उमेदवार निवडीत पक्षाचा कस लागला. पक्षनेतृत्व कमकुवत झाले की काय?
उत्तर : तसे मला अजिबात वाटत नाही. आमच्या पक्षाबाबत हा गैरसमज आहे. विखे, सत्तार यांच्यासारखी मंडळी त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थापायी बाहेर पडली आहेत. सत्तारांना मी उमेदवारी देऊ केली होती. तरीही ते एका रात्रीत जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात, हे चुकीचे आहे. कोणतीही निवडणूक सोपी नसते. प्रत्येक वेळी विविध प्रकारची आव्हाने उभी असतात. कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय आणि राज्य या दोन्ही पातळीवरचे नेतृत्व कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे. आम्ही सर्व लोक एकत्रितरीत्या काम करत आहोत.

प्रश्‍न : अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या 'वंचित बहुजन आघाडी'ला चांगला प्रतिसाद मिळतोय. ही आघाडी तुमच्या पक्षाच्या विजयातील अडसर वाटत नाही का?
उत्तर : खरं म्हणजे वंचित आघाडीशी आघाडी करण्यासंदर्भात आम्ही भरपूर वेळ दिला होता. जागा मागताना अव्वाच्या सव्वा मागण्या करून कसे चालेल? एकीकडे चर्चेचे नाटक करायचे आणि दुसरीकडे सभेमध्ये कॉंग्रेसवर टीका करून उमेदवारांच्या घोषणाही करायच्या, हे कसले धोरण? अशा स्थितीत आघाडी होऊ शकते का? या उलट मला असे म्हणायचे आहे की, वंचित आघाडी ही भाजपचीच "बी' टीम आहे. 'वंचित'चे हे मतविभागणीचे राजकारण सर्वसामान्य मतदारांना समजले आहे. तो या भूलथापांना बळी पडणार नाही.

प्रश्‍न : तुम्ही प्रचाराला थेट लोकांमध्ये फिरत आहात? मोदी सरकारविषयी लोकांमध्ये काय भावना आहे?
उत्तर : मोदी सरकारची पाच वर्षांची कामगिरी असमाधानकारक राहिली आहे. नोटाबंदी, जीएसटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी यांसारख्या निर्णयांनी सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. लोकांना दिलेल्या शब्दांशी त्यांचे सरकार प्रामाणिक राहिले नाही. लोकांचा भ्रमनिरास झालाय. विकासासंदर्भात काहीच मुद्दे नसल्याने ते 'सर्जिकल स्ट्राइक', 'पुलवामा'सारख्या घटनांचे राजकारण करत आहेत. देशप्रेमाचा मुद्दा पुढे करून अन्य विषयांकडे दुर्लक्ष करू पाहात आहेत. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना त्यांचे सरकार लोकांना दिलासा देत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com