BJP Going Ahed in Nagar | Sarkarnama

नगर जिल्ह्यात आंदोलने दणाणली, तरीही भाजपची मुसंडी सुरूच

मुरलीधर कराळे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नगर जिल्ह्यातील आंदोलनाला खूप महत्त्व न देता भाजप सरकारने ते प्रशासनाच्या हाती देत शांततेची भूमिका घेतली. आणि आपले काम चालूच ठेवले. निवडणुका जशा जवळ येतील तशा समाज जोडण्याचे धोरण भाजपने घेतलेले दिसते. काँग्रेसच्या मतांचे पाॅकेट असलेले मुस्लिम समाज आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू करीत एक-एक समाजाचा गड काबिज करण्याचे धोरण घेतले.

नगर : जिल्ह्यात विविध कारणांनी राष्ट्रवादी व काँग्रेसने जोरदार आंदोलने करून गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाला वेठीस आणले. आंदोलनात जनताही या पक्षांसोबत असायची, मात्र, तरीही ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, सेवा संस्था, नगर परिषदा आदींच्या निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा राहिला आहे. भाजपची ही मुसंडी सुरूच राहणार असल्याचे भाजप नेते ठामपणे सांगत आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, युवक कार्यकर्ते, महिला आघाड्या यांनी भाजप सरकारच्या विरोधात चारही वर्षे मोठमोठी आंदोलने केली. त्यात नोटाबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय सरकारने घेतल्याने जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले. त्याचे भांडवल करून दोन्ही पक्षांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. याशिवाय सामाजिक आंदोलनांनी वेग घेतला. मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा लावून धरत त्याचे अखेर हिंसक वळण सुरु झाले. दूधदरवाढीच्या आंदोलनाने रस्त्यावर दूध ओतून सरकारला जेरीस आणले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर वाढीसाठी आंदोलने झाले. या सर्वांचा परिणाम सरकारवर कायम आंदोलनाची झालर राहिली. मराठा आंदोलन पूर्णपणे निःपक्षीय असले, तरी त्याला इतर दोन पक्षांचे पाठबळ होते, हे लपून राहत नाही. 

भाजपचे समाजजोडो
नगर जिल्ह्यातील आंदोलनाला खूप महत्त्व न देता भाजप सरकारने ते प्रशासनाच्या हाती देत शांततेची भूमिका घेतली. आणि आपले काम चालूच ठेवले. निवडणुका जशा जवळ येतील तशा समाज जोडण्याचे धोरण भाजपने घेतलेले दिसते. काँग्रेसच्या मतांचे पाॅकेट असलेले मुस्लिम समाज आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू करीत एक-एक समाजाचा गड काबिज करण्याचे धोरण घेतले. त्याचीच पहिली पायरी म्हणजे शेवगाव व जामखेड येथे उपनगराध्यक्षपद मुस्लिम समाजाला दिले. त्यासाठी प्रा. राम शिंदे यांनी केलेले बेरजेचे राजकारण महत्त्वाचे म्हणावे लागेल.

हा विजय म्हणजे २०१९ ची तयारी : बेरड
शेवगाव व जामखेड या दोन्हीही नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने कमळ फुलविले. हा विजय म्हणजे २०१९ ची रंगीत तालीम आहे. दोन्हीही ठिकाणी उपनगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाला संधी देऊन पक्षाने अल्पसंख्यांक समाजाला एक विश्वास दिला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. जिल्ह्यातील मुस्लिम समाज भाजपच्या जवळ येतआहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने कितीही अपप्रचार केला, तरीही भाजपच्या वाटचालीवर काहीही परिणाम होणार नाही, असे मत प्रा. बेरड यांनी व्यक्त केले.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख