bjp gives 28 % ticket to women in maharshtra loksabha election | Sarkarnama

भाजपमध्ये महाराष्ट्रात 28 टक्के महिलाराज! 25 पैकी सात लोकसभा मतदारसंघांत महिला उमेदवार

योगेश कुटे
शनिवार, 23 मार्च 2019

राज्यात लोकसभा निवडणुकीत प्रमुख चार राजकीय पक्षांनी एकूण 11 महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यात सर्वाधिक महिला या भाजपच्य आहेत.

पुणे : भारतीय जनता पक्षाने राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आहे एकाच पक्षाने सर्वाधिक महिलांना लोकसभेसाठी संधी देण्याचा.

भाजप राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा लढवित असून, त्यापैकी 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. माढा, ईशान्य मुंबई आणि भंडारा-गोंदिया या तीन जागा वगळता सर्व ठिकाणचे उमेदवार ठरले आहेत. या 22 पैकी तब्बल सात मतदारसंघांत भाजपच्या महिला उमेदवार आहेत.

त्यात पूनम महाजन (मुंबई), प्रीतम मुंडे (बीड), हिना गावित (नंदुरबार), रक्षा खडसे (रावेर) या चार विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. विद्यमान आमदार स्मिता वाघ (जळगाव) यांना जळगावमधून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय डाॅ. भारती पवार (दिंडोरी) आणि कांचन कुल (बारामती) हे नवे चेहरे लोकसभा निवडणुकीसाठी निवडण्यात आले आहे.

अर्थात या सातपैकी सहा महिला उमेदवार घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात. पूनम या दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. प्रीतम या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. तर हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित राज्यात मंत्री होते. रक्षा खडसे या भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. कांचन या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. भारती पवार या माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांच्या सून आहेत.

याला अपवाद स्मिता वाघ यांचा. वाघ यांचे पती जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत. स्मिता वाघ यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सार्वजनिक कामात सहभागी होत्या. उदय वाघ व त्यांचे तेथेच सूर जुळले. त्या आता विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांना घराण्याची राजकीय पार्श्वभूमी नाही. 

शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी (यवतमाळ) या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांचे वडीलही खासदार होते. राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (बारामती) या एकमेव महिला उमेदवार आहेत. काॅंग्रेसकडून प्रिया दत्त (मुंबई) आणि चारूलता टोकस (वर्धा) यांना संधी मिळाली आहे. प्रिया दत्त यांचे वडिल दिवंगत सुनील दत्त हे खासदार होते. चारूलता टोकस यांच्या मातोश्री दिवंगत प्रभा राव या प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षा होत्या.      
 

संबंधित लेख