bjp formula for allince | Sarkarnama

भाजपचा फॉर्म्युला; शिवसेनेस स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

जागावाटपाचे भाजपचे सूत्र निश्‍चित झाले आहे.

मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत एकत्र जागावाटप करण्याची भाजपची तयारी असून, जागावाटप आणि सत्तेतील वाट्याचा फॉर्म्युला शिवसेनेला स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास भाजपची तयारी असल्याचे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. 

सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती, मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटप फिस्कटल्याने युती तुटली होती. या वेळी स्वतंत्र निवडणुका लढवत भाजपने 122, तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत पुन्हा दोन्ही पक्षांची युती झाली आणि शिवसेनेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेचे मन सत्तेत रमले नाही आणि सातत्याने शिवसेना नेत्याकडून भाजप, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात कुणाशीही युती करणार नसल्याची घोषणा केली असून, तो निर्णय यापुढेही कायम राहणार असल्याचे ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते सांगत आहेत. 

दरम्यान, गेल्या निवडणुकीतील कटू अनुभव लक्षात घेता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र जागावाटप करण्याची तयारी असेल तर युती होईल, असे शिवसेनेचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना मंत्रिमंडळातील भाजपचे नंबर दोनचे मंत्री म्हणाले की, दोन्ही निवडणुकीसाठी जागावाटप करण्याची भाजपची तयारी आहे. जागावाटपाचे भाजपचे सूत्र निश्‍चित झाले आहे. शिवसेनेसोबत याविषयी तीन-चार बैठका झाल्या आहेत. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांत जवळपास एकमत आहे. मात्र विधानसभेच्या जागांबाबत चर्चा करावी लागेल. 

संबंधित लेख