BJP to enter into Bollowood union | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

भाजपच्या चित्रपट संघाचा 12 मे रोजी 'क्लॅप'

सौमित्र पोटे
बुधवार, 10 मे 2017

भाजपा चित्रपट सेना काढते आहे. त्यामुळे पुढच्या काळात याही क्षेत्रात लोकांना तिरंगी लढती पहायला मिळणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपट लोकांचे मनोरंजन करतातच. आता चित्रपट-नाट्य़ क्षेत्रातील तीन पक्षाच्या संघटनांच्या लाथाळ्यांनी लोकांची अधिक करमणूक होईल यात शंका नाही.

सौमित्र पोटे
पुणे- शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ आता भारतीय जनता पक्ष आता आपली चित्रपट सेना काढणार आहे. शुक्रवारी 12 मे रोजी भाजपच्या या चित्रपट संघाची 'क्लॅप' मारली जाणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, शिवसेना चित्रपट सेना या दोन संघटना सध्या कार्यरत आहेत. त्या पाठोपाठ आता भाजपने 'भाजप सिने, टीव्ही, नाट्यसंघ' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दादर क्लब येथे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिने दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ अभिनेते  अभिनेते रमेश देव व सौ. सीमा देव, बालाजी टेलिफिल्म्सच्या निवेदिता बसू यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता या संघाची स्थापना होणार आहे. या कार्यक्रमाला मराठी-हिंदी चित्रपट-नाट्य सृष्टीतील अनेक दिग्गज कलावंत उपस्थित राहणार असल्याचे 'भाजप सिने, टीव्ही, नाट्यसंघा'चे सचीव शांताराम सुर्वे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर आहे. अशा परिस्थितीत चित्रपट उद्योगाची राजधानी असलेल्या मुंबईत भाजपचे या क्षेत्रात अस्तित्व निर्माण करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न आहे. शिवसेना व मनसेच्या चित्रपट संघटनांनी यापूर्वी अनेक पाकिस्तानी कलाकारांना भारतात आपली कला सादर करायला विरोध केला होता. आता भाजपा चित्रपट सेना काढते आहे. त्यामुळे पुढच्या काळात याही क्षेत्रात लोकांना तिरंगी लढती पहायला मिळणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपट लोकांचे मनोरंजन करतातच. आता चित्रपट-नाट्य़ क्षेत्रातील तीन पक्षाच्या संघटनांच्या लाथाळ्यांनी लोकांची अधिक करमणूक होईल यात शंका नाही.

या सगळ्यात पंचाईत होणार आहे ती चित्रपट-नाट्य सृष्टीतल्या कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. चित्रपट उद्योगाची पाळेमुळे मुंबईतच रुजली आहेत. पण राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर आहे. दुसऱ्या बाजूला मनसेच्या 'खळखट्याक'चा धाक आहे. त्यामुळे पुढच्या काळात नक्की ऐकायचे कुणाचे हा प्रश्न चित्रपट-नाट्य सृष्टीला नाही पडला तरच नवल.               

 

 

संबंधित लेख