BJP doing injustice towards W. Maharashtra : Ajit Pawar | Sarkarnama

भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय : अजित पवार 

उत्तम कुटे
गुरुवार, 6 जुलै 2017

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान न झाल्याने राष्ट्रवादीवर पराभवाची वेळ आली, मात्र त्याने खचून न जाता आक्रमकपणे कामाला लागण्याचा आदेश अजित पवार यांनी दिला. तसेच कामे न करणाऱ्यांची पदे काढून घेण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

पिंपरी : सत्तेत येऊन तीन वर्षानंतरही काम न करणारे केंद्र व राज्य सरकार नाकर्ते ठरले असून शेतकरी विरोधी असलेल्या या दोन्ही सरकारांकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 6) चिंचवड येथे केली. 

पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पालिका निवडणुतील पराभवामुळे नव्हे, तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन व त्यानंतरची संघर्ष यात्रा यामुळे चार महिने पिंपरी-चिंचवडला येता आले नाही, असे ते म्हणाले. मात्र,या पराभवाचे शल्यही त्यांनी बोलून दाखविले.

या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,प्रदेश युवकाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, युवती अध्यक्षा स्मितापाटील,माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या गर्दीने सभागृह पूर्ण भरल्याने अनेकांना खाली बसावे लागले.

भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असलेले माजी आमदार अण्णा बनसोडे यांची गैरहजेरी अनेकांना खटकत होती. पवार व तटकरे यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडी, शेतकऱ्यांची घोंगडी व आसूड आणि आसूड हे पुस्तक देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे चुलतबंधू व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत यावेळी पुन्हा प्रवेश केला. 

"आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच आता त्यात अडकले आहेत, अशी टीका पवार यांनी पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर केली.

ते म्हणाले, ""चार महिने पिंपरी पालिकेत सत्तेत येऊनही ते अद्याप भांबावलेलेच आहेत. बहुमत असूनही अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत. ते कचखाऊ आहेत. त्यामुळेच त्यांनी आमच्या चार नगरसेवकांचे हुकूमशाहीतून निलंबन केले व नंतर ते मागेही घेतले. त्यांना शहराची आस्था नाही.आमच्या राजवटीत केलेल्या कामाची बिले यांनी का थकविली आहेत, ते कळत नाही. कामे योग्य असतील, तर ती द्या, अन्यथा संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका.रिंगरोडसाठी त्यांचा अट्टहास का सुरू आहे. दुसरीकडे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असा पवना जलवाहिनीचा प्रकल्प त्यांची तिन्ही ठिकाणी सत्ता असून अडवून ठेवला आहे''. 

एकसंधपणे मोदी लाटेला सामोरे गेले असतो, तर पराभवाचा सामना करावा लागला नसता, असे तटकरे म्हणाले. त्यामुळे भूतकाळ विसरून उज्वल्ल भविष्यकाळासाठी मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागण्याचा आदेश त्यांनी दिला.तसेच सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.तर लोकांना भूलवून जाहिरातीवर निवडून आलेल्या या दोन्ही सरकारांच्या राजवटीत महिला व मुली सुरक्षित राहिल्या नसल्याचे वाघ म्हणाल्या. 
पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचीही भाषणे झाली. वाघेरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले.  

 
 

संबंधित लेख