उत्तर प्रदेशात भाजपने घडविला इतिहास...

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या विजयाची पुनरावृत्ती भाजपला करता येईल; अथवा नाही, यासंदर्भात अत्यंत उत्सुकता होती. पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वासाठीही उत्तर प्रदेश ही मोठी कसोटी होती. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून मिळविण्यात आलेले यश हे मोदी व शहा या जोडीचे असामान्य यश तर आहेच; शिवाय रामजन्मभूमी आंदोलनानंतर भाजपचे सुशासन व विकासाचे आलेले नवे व्हर्जन ही नागरिकांच्या पसंतीस उतरत असल्याचा हा आणखी एक पुरावा मानता येईल.
उत्तर प्रदेशात भाजपने घडविला इतिहास...

देशातील राजकीयदृष्टया सर्वांत संवेदनशील राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षास (भाजप) मिळालेला नेत्रदीपक विजय हा सर्वार्थाने ऐतिहासिक म्हणावयासही हरकत नाही.

विधानसभेच्या 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने तब्बल 306 जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणीमधील हे प्राथमिक कल असले; तरी राज्यात भाजप मिळविलेले हे यश 'न भुतो...' असल्याचे मात्र स्पष्ट आहे.

उत्तर प्रदेशमधील राजकारण हे एकंदरच देशाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टिकोनामधूनही अत्यंत संवेदनशील मानले जाते. उत्तर प्रदेशमधील रामजन्मभूमी आंदोलन असो; वा त्याआधी समाजवादी विचारसरणी असलेल्या पक्षांचा झालेला उदय असो; या राज्यामधील विविध आंदोलनांवर देशाचे भविष्य व केंद्रीय नेतृत्वाचे सुकाणु ठरत असल्याचा इतिहास आहे.

अयोध्यामधील रामजन्मभूमी आंदोलनानंतर राज्यात भाजपला खऱ्या अर्थी सामर्थ्य प्राप्त झाले. उत्तर प्रदेशमध्ये 1991 मध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपला 221 जागा जिंकण्यात यश आले होते. संपूर्ण देशभर झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाची हिंसक पार्श्‍वभूमी या यशास होती. यानंतर 1996 मधील बसप-भाजपच्या युतीच्या सत्तेचा अपवाद वगळता गेल्या दोन दशकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेशमधील सत्तेपासून वंचितच रहावे लागले आहे.

राज्यात अखेरच्या झालेल्या 2012 मधील निवडणुकीमध्ये तर पक्षास अवघ्या 47 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर, या निवडणुकीत पक्षास मिळालेले यश हे उल्लेखनीय व ऐतिहासिक मानावे लागेल.

या निवडणुकीसाठी भाजपने आखलेल्या रणनीतीमध्ये दोन मुद्यांवर विशेषत्वे भर दिल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेश राज्यामध्ये विकासाची फार मोठी क्षमता असतानाही निव्वळ राज्यकर्त्यांच्या गैरकारभारामुळे राज्यास विकासापासून वंचित रहावे लागत आहे, अशा भूमिकेचा आश्रय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. याचबरोबर, जातीय ध्रुवीकरण करण्याची क्षमता असलेल्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या मुद्यासहित इतर अशा स्वरुपाच्या संवेदनशील मुद्यांना पक्षाच्या प्रचारात प्रकर्षाने स्थान देण्यात आले नाही. 'सुशासन व विकास' हाच भाजपच्या प्रचाराचा गाभा असल्याचे आढळून आले.

याचबरोबर, सत्ता मिळाल्यास गुंडगिरी संपवून कायदा व सुव्यवस्था निर्माण करु या आश्‍वासनाचाही पक्षास मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचे मानले जात आहे. उदाहरणार्थ, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले मंत्री गायत्री प्रजापती यांच्या असलेल्या समावेशास भाजपकडून प्रभावीरित्या लक्ष्य करण्यात आले. यामुळेही पक्षास 'महिलांची सुरक्षा' हा विषय प्राधान्यक्रमावरील असल्याचा संदेश देण्यात यश आल्याचे निष्पन्न झाले आहे.

उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या दृष्टिकोनामधूनही अर्थातच अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक अत्यंत संवेदनशील व आव्हानात्मक जात होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भाजपने 72 जागा मिळवित नेत्रदीपक विजय प्राप्त केला होता. त्यावेळी 385 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी मिळाली होती. यातील जवळपास 300 मतदारसंघांमधील आघाडी टिकविण्यात भाजपला यश आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com