bjp-corporator-madhuri-adwant-arrested- | Sarkarnama

मतीनला चपलेने मारणाऱ्या माधुरी अदवंत यांची अटक व सुटका

सरकारनामा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अटल  बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या सय्यद मतिनला चपलेने मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेविका माधुरी अदवंत यांना पोलिसांनी अटक केली .

औरंगाबादः अटल  बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या सय्यद मतिनला चपलेने मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेविका माधुरी अदवंत यांना पोलिसांनी अटक केली आणि नंतर त्यांची जामिनावर  मुक्तता केली . 

एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (ता.20) दुपारी चारच्या सुमारास पोलीसांनी भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौवरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे, माधुरी अदवंत यांना अटक केली होती. या सर्वांची जामीनावर सुटका करणयात आली आहे. 

17 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवल्यामुळे भाजप नगरसेवकांनी सभागृहातच त्यांना बेदम मारहाण केली होती. 

या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून सय्यद मतीन यांच्या विरोधात सिटीचौक पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

तर मतीन यांना मारहाण केल्याप्रकरणी उपमहापौरांसह पाच नगरसेवकांविरुध्द देखील सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आज दुपारी चारच्या सुमारास पोलीसांनी आधी विजय औताडे यांना त्यांच्या संपर्क कार्यालयातून अटक केली. त्यानंतर प्रमोद राठोड, राजगौवरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे आणि माधुरी अदवंत यांना अटक करण्यात आली होती. 

दरम्यान, भाजप नगरसेवकांना अटक झाल्याची माहिती कळताच महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. सायंकाळी या सर्व नगरसेवकांची पोलीसांनी जामीनावर सुटका केली.

संबंधित लेख