BJP Concentrates on Aurangabad West | Sarkarnama

भाजपचा आता मित्रमंडळांवर डोळा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 मे 2017

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावत असतांनाच मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवसेनेला कुमकूवत करण्याचा प्रयत्न देखील भाजपने चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी संत एकनाथ रंग मंदिरात भाजपने भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी पद्मपुरा भागातील आदित्य दहिवाळ यांच्यासह पाचशे कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचा दावा भाजपने केला आहे.

औरंगाबाद - मिशन 2019 डोळ्यासमोर ठेवत भाजपने शहरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना पक्षात खेचण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देतानाच आता राजकीय पक्षांप्रमाणेच मित्रमंडळांच्या नावाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

शनिवारी पद्मपुरा भागातील अशाच एका मित्रमंडळाच्या पाचशे तरुण कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपमध्ये करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी महिनाभरात पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना भाजपमध्ये प्रवेश देत शिवसेनेला धक्का दिला होता. विद्यमान आमदार संजय सिरसाट यांच्या मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष्य केंद्रीत केल्याचे यावरून सिद्ध होते.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावत असतांनाच मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवसेनेला कुमकूवत करण्याचा प्रयत्न देखील भाजपने चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी संत एकनाथ रंग मंदिरात भाजपने भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी पद्मपुरा भागातील आदित्य दहिवाळ यांच्यासह पाचशे कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचा दावा भाजपने केला आहे. शिवसेनेने तिकीट नाकारल्यावर अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले नगरसेवक गजानन बारवाल यांचा हा वाॅर्ड. त्यामुळे या प्रवेशामागे बारवाल असल्याचे बोलले जाते.

भाजपकडून बारवाल यांना स्थायी समितीचे सभापती पद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून बारवाल यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

औरंगाबाद पश्‍चिम टार्गेट
औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. संजय सिरसाट हे या मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये सिरसाट हे फार कमी मतांनी विजयी झाले. इथे भाजपच्या उमेदवाराने त्यांना कडवी लढत दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार नाही हे गृहित धरून भाजपने मोर्चे बांधणी सुरु केली असून निसटता पराभव झालेल्या पश्‍चिमवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिरसाट यांचे विश्‍वासू व एकेकाळी स्वीय सहायक राहिलेले बाळू गायकवाड, व अपंग सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला प्रवेश देऊन भाजपने आमदार सिरसाट व शिवसेनेला दणका दिला होता.

त्यांनतर पुन्हा याच मतदारसंघातील पाचशे कार्यकर्त्याना पक्षात प्रवेश देऊन शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजाराला भीषण आग लागली होती. या आगीला फटाका व्यापारी संघटना जबाबदार असल्याचा आरोप करत संजय सिरसाट यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. गुन्हे दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. फटाका व्यापारी संघटनेत तनवाणी यांचे बंधू व नगरसेवक राजू तनवाणी हे असल्यामुळेच सिरसाट यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती अशी चर्चा त्यावेळी होती. 'पश्‍चिम'ला लक्ष्य करण्यामागे या घटनेचा तर काही संबंध नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

संबंधित लेख