BJP Cheated Dhangar Community Alleges Tushar Shewale of Congress | Sarkarnama

'भाजप'ने धनगर समाजाला आमिष दाखवून विश्वासघात केला : डॉ. तुषार शेवाळे 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

"भारतीय जनता पक्षाने निवडणुकीआधी धनगर समाजाला आरक्षणाची स्वप्न दाखवले. मतांसाठी आमिष दाखवून विश्‍वासघात केला. सत्तेत आल्यावर कॉंग्रेस पक्ष मात्र यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करेल," असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सदस्य डॉ. तुषार शेवाळे यांनी केले. 

नाशिक : "भारतीय जनता पक्षाने निवडणुकीआधी धनगर समाजाला आरक्षणाची स्वप्न दाखवले. मतांसाठी आमिष दाखवून विश्‍वासघात केला. सत्तेत आल्यावर कॉंग्रेस पक्ष मात्र यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करेल," असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सदस्य डॉ. तुषार शेवाळे यांनी केले. 

सकल धनगर समाज संस्थेतर्फे मालेगाव परिसरातील धनगर समाज बांधवांचा मेळावा कंक्राळे येथे झाला. यावेळी समाजाला अनुसुचित जाती घटकात आरक्षण मिळावे असा ठराव करण्यात आला. यावेळी डॉ. शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, "भाजपच्या नेत्यांनी निवडणूकीपूर्वी तोंड भरुन आश्‍वासने दिली. सरकारने धनगर समाजाला आमिष दाखवले. प्रत्यक्षात काहीही न केल्याने समाजाचा विश्वासघात केला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यावर समाजबांधव ठाम आहेत. मात्र, यापुढे काँग्रेसच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पाठपुरावा करण्यात येईल." 

समाजाला आरक्षण मिळावे, सोलापुर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात यावे, मेंढपाळांच्या मुलांना शिक्षणासाठी निवासी वस्तीगृह बांधावे, वनविभागाकडून मेंढपाळांना चराईसाठी पास मोफत मिळावा, मालेगाव तालुक्‍यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे आदी मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या. विविध नेत्यांनी त्यावर चर्चेत भाग घेतला. यावेळी धुळे समाज कल्याण सभापती भाऊसाहेब गर्दै, निवृत्त अभियंता विजय हाके, नवनाथ ढगे, कल्याणी वाघमोडे, विनोद खेमनार, खंडेराव पाटील, पी. आर. कन्होर, तुषार दासनोर उपस्थित होते. 

संबंधित लेख