आधी तुम्ही शेतकऱ्याची बळकावलेली जमिन परत द्या,  भाजपचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

माझी पूस शिवारात गट नंबर ३६ मध्ये ३ हेक्टर १२ गुंठे जमीन खरेदी केली पण त्याचा मोबदला दिला नाही . मोबदल्यासाठी खेट्या मारल्यावर ४० लाखांचा खोटा चेक देण्यात आला . माझ्या कुटुंबातील पाच जणांना नोकरी देण्याचे आपले आश्वासनदेखील कागदोपत्रीच राहिले .-मुंजा गिते
Dhananjay-Munde
Dhananjay-Munde

बीड :महामार्गासाठी जमिनी संपादन करण्या बाबतच्या सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांच्या संमती शिवाय इंचभरही जमिन  घेऊ देणार नाही, प्राण गेला तरी बेहत्तर पण कायदा संमत होऊ देणार नाही अशी गर्जना  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती .

पण  भाजपने  धनंजय मुंडे यांना चांगलेच खिंडीत गाठले आहे. अगोदर तुम्ही शेतकऱ्याची लुबाडलेली जमिन परत द्या मग फुकटच्या गप्पा मारा ,अशी कानटोचणी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केली आहे . 

मुंजा गिते  या शेतकऱ्याने धनंजय मुंडे यांना लिहलेले पत्र सोशल मिडीयावर    मंगळवार पासून  व्हायरल होत आहे.   त्या आधारे आता भाजपने धनंजय मुंडे यांना चांगलेच खिंडीत गाठले आहे.

धनंजय मुंडे प्रवर्तक असलेल्या पुस (ता. अंबाजोगाई) येथील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी ही जमिन घेतली. जमिनीचा मोबदला तर दिलाच नाही शिवाय चाळीस लाखांचा खोटा धनादेश देवून त्या शेतक-याची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही रमेश पोकळे यांनी केला आहे . शेतकऱ्याच्या पत्रातही तसा उल्लेख आहे.

कुटूंबातील पाच जणांना नोकरी देण्याचे आश्वासनही कारखाना झाला नसल्याने हवेत विरले. केवळ मुंजा गितेच नाही तर अनेक शेतक-यांची धनंजय मुंडे यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत.धनंजय मुंडे यांनी स्वतःच्याच भागातील गोरगरीब शेतक-यांची घोर फसवणूक केल्यामुळे त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा अधिकार नसून त्यांचे प्रेम पुतना  मावशीचे असल्याचा टोलाही  पत्रकात लगावण्यात आला.

प्राण देण्यापेक्षा आमच्या जमिनी परत  द्या

 सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत असलेल्या  मुंजा गिते  यांच्या पत्रात असे म्हणण्यात आले आहे की ,‘'आपले कालचे शेतकऱ्यांच्या जमिनी विषयीचे निवेदन वाचुन शेतकऱ्यांच्या जमिनी  वाचवण्यासाठी आपल्या जीव देण्याच्या प्रतिज्ञेवरुन आम्हाला तुमचे मतपरिवर्तन झाल्याची खात्री वाटत आहे. तरी आपण जगमित्र साखर कारखान्याच्या नावाने लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करुन आदर्श ऊभा करावा.

जमिनी परत मिळाल्यास माझ्या सारख्या अनेक कुटुंबांवर जीव देण्याची वेळ टळेल.माझी पूस शिवारात गट नंबर ३६ मध्ये ३ हेक्टर १२ गुंठे जमीन खरेदी केली पण त्याचा मोबदला दिला नाही . मोबदल्यासाठी खेट्या मारल्यावर ४० लाखांचा खोटा चेक देण्यात आला . माझ्या कुटुंबातील पाच जणांना नोकरी देण्याचे आपले आश्वासनदेखील कागदोपत्रीच राहिले .  त्यामुळे ‘प्राण देण्यापेक्षा आमच्या जमिनी परत द्या’ असा पत्रात उल्लेख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com