BJP is again NO 1 party : Raosaheb Danve | Sarkarnama

 भाजपा पुन्हा नंबर १ : खा.रावसाहेब  दानवे 

भास्कर बलखंडे 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

2015 पासून आजपर्यंत राज्यात सर्व 27 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असून त्यामध्ये भाजपाने सर्वाधिक 1100 जागा जिंकल्या आहेत.

जालना: " धुळे महानगरपालिकेत 74 पैकी 50 तर अहमदनगर महानगरपालिकेत 14 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा यशस्वी पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो", अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार  रावसाहेब  दानवे यांनी सोमवारी व्यक्त केली. 

 निकाल जाहीर झालेल्या सहा नगरपालिका – नगरपंचायतींपैकी लोहा (नांदेड), शेंदुर्णी (जळगाव) व मौदा (नागपूर) ही 3 नगराध्यक्षपदे आणि सर्वाधिक 37 नगरसेवकपदे जिंकून नगरपालिकांच्या निवडणुकातही भाजपा पहिल्या क्रमांकावर राहिल्याचे ते म्हणाले.

श्री. दानवे पुढे म्हणाले ," धुळे महानगरपालिकेत भाजपाने गेल्या वेळच्या तीन जागांवरून झेप घेऊन 50 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. अहमदनगर महापालिकेत गेल्या वेळच्या 9 जागांवरून वाढ होऊन 14 जागा भाजपाला मिळाल्या. धुळे व अहमदनगर येथे भाजपाच्या विजयासाठी परीश्रम करणाऱ्या पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो."

" 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाची यशाची मालिका चालू आहे. धुळे – अहमदनगर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही मालिका कायमच राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे काम तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली बळकट झालेली पक्ष संघटना यामुळे पक्षाला यश मिळत आहे ," असेही  ते म्हणाले.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले ," 2015 पासून आजपर्यंत राज्यात सर्व 27 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असून त्यामध्ये भाजपाने सर्वाधिक 1100 जागा जिंकल्या आहेत. भाजपाविरोधी पक्षांच्या एकूण जागाही भाजपाएवढ्या नाहीत. राज्यातील 27 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये भाजपाच्या नगरसेवकांची संख्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे तर एका महानगरपालिकेत ही संख्या कायम राहिली. 27 पैकी सोळा महानगरपालिकांमध्ये यापूर्वी भाजपा स्वबळावर किंवा युतीच्या माध्यमातून सत्तेवर आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आज धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे."
 

संबंधित लेख