भाजपचे 50 आमदार "डेंजर झोन'मध्ये 

भाजपचे 50 आमदार "डेंजर झोन'मध्ये 

मुंबई : दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचे धनी बनलेले केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने दिल्लीतील चाणक्‍य या संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात, भाजपचे राज्यातील सहा खासदार आणि जवळपास 50 आमदारांच्या जागा पुढील निवडणुकीत "डेंजर झोन'मध्ये असल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेक्षणानुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. नुकत्याच झालेल्या या सर्वेक्षणात, मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यास सांगितले होते. आमदार-खासदाराची कामगिरी समाधानकारक आहे की नाही ?, आमदार-खासदारपदाचा उमेदवार बदलावा की कायम ठेवावा? असे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते. 

महत्त्वाचे म्हणजे विद्यमान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची कामगिरी खूपच निराशाजनक असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यांना केवळ 19 टक्के पसंती आहे. मात्र, भामरे यांनी ते नाकारत, आपल्याला 50 टक्के मते मिळाल्याचा दावा केला.
 
याशिवाय राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे यांचीही कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे सर्वेत नमूद आहे. भाजपच्या आमदार-खासदारांची बैठक मंगळवारी (ता. 9) दादरमधील वसंत स्मृती या भाजप मुख्यालयात झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी शेवटी प्रत्येक आमदार-खासदारांना बंद लिफाप्यात त्या-त्या भागातील सर्वेचे निष्कर्ष सोपवले. घरी जाऊन लिफाफा उघडा आणि कार्ड बघा, अशा सूचना या वेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना दिल्या. इतकंच नाही तर या सर्वेक्षणाबद्दल माध्यमांसमोर अवाक्षरही काढू नका, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. 

कामगिरी सुधारा! 
भाजपच्या एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षणात 40 टक्के आमदारांची चार वर्षांतील कामगिरी अत्यंत वाईट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जर उर्वरित कार्यकाळात कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. 

दुसरीकडे ज्या खासदारांना केवळ 19 टक्‍क्‍यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांची उमेदवारी धोक्‍यात आली आहे. सध्याच्या भाजपच्या 21 खासदारांपैकी सहा खासदांची तिकिटे 2019 मध्ये कापली जाण्याची चिन्हे आहेत. यामध्ये रक्षा खडसे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची नावे असल्याचे सांगण्यात येते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com