bjp | Sarkarnama

भाजपची राज्यात ‘पक्ष विस्तारक’ योजना

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

भारतीय जनता पक्षाची ‘पक्ष विस्तारक’ योजना कार्यान्वित होत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व कार्य विस्तारक विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष विस्तारासाठी जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विस्तारकांची यादी शुक्रवारपर्यंत (ता. ५) निश्‍चित होणार असून, निवडलेले विस्तारक किमान पंधरा दिवसांसाठी सक्तीने वेगवेगळ्या गावांत जाऊन पक्ष संघटना वाढीचे काम करणार आहेत.

पिंपरी - भारतीय जनता पक्षाची ‘पक्ष विस्तारक’ योजना कार्यान्वित होत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व कार्य विस्तारक विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष विस्तारासाठी जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विस्तारकांची यादी शुक्रवारपर्यंत (ता. ५) निश्‍चित होणार असून, निवडलेले विस्तारक किमान पंधरा दिवसांसाठी सक्तीने वेगवेगळ्या गावांत जाऊन पक्ष संघटना वाढीचे काम करणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या आठवड्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. तिच्या समारोपप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष समारोपाच्या निमित्ताने पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात ‘पक्ष विस्तारक’ योजना मांडली होती. जे पदाधिकारी, कार्यकर्ते या पंधरा दिवसांत कार्यविस्तारकाचे प्रामाणिकपणे काम करणार नाहीत, त्यांची नावे जाहीर करून त्यांना उघडे पाडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले होते.

अशी आहे पक्ष विस्तारक योजना
पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने पंधरा दिवस विस्तारक म्हणून परगावी जायचे आहे. याशिवाय तीन महिने, सहा महिने व एक वर्ष विस्तारक म्हणून स्वेच्छेने काम करण्याचाही पर्याय पदाधिकाऱ्यांपुढे आहे. खासदार, आमदार, महापालिका, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, सदस्य अशा सर्वांसाठीच ही योजना सक्तीने राबविण्यात येणार आहे. 

पुण्यात झाली बैठक
कार्यविस्तारक योजनेबाबत भाजप प्रदेश संघटन सचिव रवी भुसारी यांनी मंगळवारी (ता. २) पुण्यात बैठक घेतली. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हा कार्यकारिणींच्या पदाधिकाऱ्यांना योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तातडीने जिल्हास्तरावर कार्यविस्तारकांची यादी तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या संभाव्य कार्यविस्तारकांची यादी शुक्रवारपर्यंत तयार केली जाणार आहे. त्याची जबाबदारी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व जिल्हा संघटन सरचिटणीस माउली थोरात यांच्यावर आहे. 

कार्य विस्तारकाची जबाबदारी
बूथवरील कार्यकर्त्यांच्या रोज सकाळी गाठी-भेटी घेणे, 
सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेणे व त्यांना कार्यविस्तारक योजनेची माहिती देणे    
बूथवरील घरोघरी संपर्क साधणे 
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना तसेच केंद्र-राज्याच्या अन्य योजनांची माहिती देणे, पत्रक वाटप
बूथवरील मतदारांची यादी तयार करणे
संस्था, मंडळ, शाळा, सहकारी संस्थांची माहिती गोळा करणे
रोज सायंकाळी सभा (कॉर्नर सभा) घेणे
सभा संपल्यावर बूथची पुनर्रचना करणे  
बूथवर किमान एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करणे
सायंकाळचे कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्यांशी अनौपचारिक गप्पा मारणे
त्याच ठिकाणी मुक्काम करणे, दैनंदिन कार्यक्रमाची डायरीत नोंद करणे

संबंधित लेख