birthday of girish bapat | Sarkarnama

कडवी पक्षनिष्ठा आणि सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्री ...

उमेश घोंगडे
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील सर्वात यशस्वी नेते ठरलेले पालकमंत्री गिरीश बापट यांचा आज वाढदिवस. गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षाचे शहराध्यक्ष, अशी वाटचाल करीत पुण्यात भाजपाचे सलग पाच वेळा आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. चार वर्षापूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच ते राज्यात मंत्री झाले. पुण्याच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबरोबरच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कामकाज विभागाची जबाबदारी बापट यांच्याकडे आहे.

भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील सर्वात यशस्वी नेते ठरलेले पालकमंत्री गिरीश बापट यांचा आज वाढदिवस. गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षाचे शहराध्यक्ष, अशी वाटचाल करीत पुण्यात भाजपाचे सलग पाच वेळा आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. चार वर्षापूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच ते राज्यात मंत्री झाले. पुण्याच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबरोबरच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कामकाज विभागाची जबाबदारी बापट यांच्याकडे आहे. 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ असूनही पालकमंत्री बापट यांना डावलून त्यावेळी नवख्या असलेल्या दिलीप कांबळे यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. यावेळी सत्ता आल्यानंतर मात्र बापट यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गेल्या 25 वर्षाच्या काळात बापट यांचे विधी मंडळातील काम वाखाणण्याजागे आहे. सर्वपक्षीय आमदार, नेत्यांशी बापट यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने संसदीय कामकाज विभागाची जबाबदारी सुरवातीपासून त्यांच्याकडेच आहे. विरोधी पक्षात असताना विधी मंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देखील बापट यांच्याकडे अनेक वर्ष होते. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, साहित्यिक, सांस्कृतिक संस्थाबरोबर बापट यांचे सुरवातीपासून चांगले संबंध आहेत. 

1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्यावतीने त्यांनी पुण्याची जागा लढविली होती. मात्र त्यावेळी कॉंग्रेसचे सुरेश कलमाडी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आमदार, मंत्री म्हणून काम करीत असले तरी खासदार होण्याची बापट यांची सुरवातीपासूनची सुप्त इच्छा दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून ते इच्छुक होते. मात्र पक्षाचे खासदार अनिल शिरोळे यांच्या बाजूने कौल दिल्याने बापट यांचा नाईलाज झाला. मात्र त्यानंतर आठ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात थेट कॅबिनेट मंत्री होण्याची संधी बापट यांना मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेचा सर्वाधिक फायदा पालकमंत्री बापट यांना झाला. विधानसभेच्या पुण्यातील आठही जागा भाजपने जिंकल्या. शहर भाजपचे नेते असल्याने या साऱ्या यशाचे श्रेय पालकमंत्री बापट यांना मिळाले. पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत यशाची चढती कमान राहिली. या निवडणुकीत पक्षाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. बापट यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मिळालेले हे ऐतिहासिक यश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख