Big Boss Shilpa Shinde to campaign along with Nagma for Congress | Sarkarnama

नगमा बरोबर 'बिग बॉस' शिल्पा शिंदे करणार कॉंग्रेसचा प्रचार 

सरकारनामा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

'भाभी जी घर पर है' या टीव्ही मालिकेमुळे शिल्पा शिंदे  घराघरांत पोचली होती; पण मालिकेचे दिग्दर्शक आणि चॅनलचे प्रोड्यूसर यांच्याशी झालेल्या वादामुळे तिने मालिकाच सोडली होती.

मुंबई  : भाजपने चित्रपट अभिनेत्री ईशा कोप्पीकरला नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देऊन आठ दिवस झाले नाहीत तर काँग्रेसने अभिनेत्री शिल्पा शिंदेला पक्षात प्रवेश दिला आहे . 

विविध राजकीय पक्षांतर्फे निवडणूक प्रचारासाठी ग्लॅमर असलेल्या आणि गर्दी खेचण्याचे सामर्थ्य असलेल्या चित्रपट अभिनेते आणि तारकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याची मोहीम नजीकच्या काळात तीव्र केली जाईल असे दिसते . 

सध्या काँग्रेसतर्फे मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्री नगमा संजय निरुपम यांच्यासोबत पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित असते  . तिने प्रिया दत्त यांच्या लोकसभा मतदारसंघावर दावाही केलेला आहे . 

हेमा मालिनी , स्मृती इराणी अशा नामवंत कलावंतांना भाजपने यापूर्वीच पक्षात स्थान दिलेले आहे . माधुरी दीक्षितला  भाजपच्या प्रचारात उतरवण्याचे प्रयत्नही सुरु आहेत .

त्यामुळे काँग्रेस पक्ष कसा मागे राहिल ? काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम  यांनी आज मोठ्या थाटामाटात छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदेला  आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला . 

'भाभी जी घर पर है' या टीव्ही मालिकेमुळे शिल्पा शिंदे  घराघरांत पोचली होती; पण मालिकेचे दिग्दर्शक आणि चॅनलचे प्रोड्यूसर यांच्याशी झालेल्या वादामुळे तिने मालिकाच सोडली होती. त्यानंतर जवळजवळ दोन वर्षे टीव्ही जगतापासून ती दूर राहिली होती; पण आता शिल्पाने एका नव्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

  शिल्पा शिंदेची लोकप्रियता अफाट आहे, हे 'बिग बॉस'वेळी दिसून आले होते. याआधी तिने देखील राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. मालिका सोडल्यानंतर 'बिग बॉस'मध्ये संधी मिळाली. त्या काळात शिल्पाला सलमान खानने पाठिंबा दिला होता. 'बिग बॉस'च्या 11व्या पर्वाची विजेती झाल्यानंतर तिला चित्रपटांची ऑफरदेखील आली होती.

संबंधित लेख