bidri suger factory | Sarkarnama

"बिद्री'च्या निवडणुकीत भाजपचा भाव वाढला! 

निवास चौगले 
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मी आवाक्‌ झालो-मुश्रीफ 
आज सेना-भाजपा नेत्यांत झालेल्या बैठकीच्या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला. पुतण्याच्या मुलाच्या लग्नासाठी ते हुबळीत होते. ते म्हणाले,"यापुर्वीच आमची व भाजपाची आघाडी झाली आहे. पालकमंत्री पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांना उत्पादक गटातील तीन, भटक्‍या विमुक्त व महिला प्रतिनिधी गटातील प्रत्येकी एक अशा पाच जागा देण्यावर एकमत झाले. त्यांनीही याला मान्यता दिली आहे. त्यावेळी माझ्यासह के. पी. ए. वाय. व हाळणवकर उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा शिवसेना नेत्यांशी बैठक झाल्याचे ऐकल्यानंतर मी आवाक्‌च झालो. पण शिवसेनेचे लोक आले म्हणून त्यांनी चर्चा केली असेल. डॉल्बीमुक्त मिरवणूक झाली म्हणून अंबाबाईला दंडवत घालणाऱ्या पालकमंत्री पाटील यांच्यासारखा माणूस बदलणार नाही असे मला वाटते.' 

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपात जागा वाटपाच फॉर्म्युला निश्‍चित होऊन या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असतानाच आज शिवसेना नेत्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरही आघाडीचा प्रस्ताव ठेवला. 

दरम्यान, भाजपाने शिवसेनेकडे सात जागांची मागणी केली असून यावर इतरांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन या बैठकीला उपस्थितीत आमदार प्रकाश अबीटकर व प्रा. संजय मंडलिक यांनी दादांना दिले. यावेळी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकरही उपस्थित होते. हॉटेल अयोध्या येथे ही बैठक झाली. या निवडणुकीत भाजपा-सेना अशीच आघाडी होईल असा दावा या बैठकीला उपस्थितीत शिवसेना नेत्यांनी केला. 

"बिद्री' च्या निवडणुकीत कधी नव्हे ते भाजपाला महत्त्व आले आहे. चार तालुक्‍याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कागल तालुक्‍यात "म्हाडा' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व मुरगुडचे प्रविणसिंह पाटील यांची, भुदरगड तालुक्‍यात माजी आमदार बजरंग देसाई यांची मदत हवी आहे. ही मदत मिळायची असेल तर भाजपासोबत आघाडी करण्याशिवाय पर्याय त्यांच्यासमोर नाही. या पार्श्‍वभुमीवर दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची पालकमंत्री पाटील, आमदार हाळवणकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत भाजपाला पाच जागा देण्याचा निर्णय सर्वानुमते मान्य करून ही आघाडी निश्‍चित झाल्याचे जाहीर करण्यात आले. यात उत्पादक गटातील तीन, भटक्‍या विमुक्त व महिला प्रनिनिधी गटातील प्रत्येकी एक जागा भाजपाला देण्याचे ठरले. राष्ट्रवादीने ही तडजोड मान्य केली होती. 

एकीकडे राष्ट्रवादीशी आघाडी निश्‍चित झाली असतानाच आज पालकमंत्री पाटील यांच्यासह हाळवकरण यांच्याशी शिवसेनेचे आमदार अबीटकर, प्रा. संजय मंडलिक यांनी हॉटेल अयोध्या येथे चर्चा केली. या चर्चेत पालकमंत्री पाटील यांनी शिवसेनेकडे सात जागांची मागणी केली. राज्यात व देशातही भाजपासोबत शिवसेनेची आघाडी असल्याने हीच आघाडी या कारखान्याच्या निवडणुकीत कायम रहावी असे श्री. अबीटकर यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. त्यावर भाजपाकडून जागांचा प्रस्ताव देण्यात आला. आघाडीतील इतरांशी चर्चा करून दोन दिवसांत यावर निर्णय देण्याचे आश्‍वासन श्री. अबीटकर, प्रा. मंडलिक यांनी दादांना दिले. 
 

संबंधित लेख