Bhujbal's name on Make in Nashik Invitation creates row | Sarkarnama

'मेक इन नाशिक'च्या निमंत्रण पत्रिकेवर तुरुंगात असलेल्या भुजबळांचे नाव

संपत देवगिरे
गुरुवार, 25 मे 2017

या कार्यक्रमात शासनाचा सहभाग असल्याने सर्व कामकाजाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता घेतली जाते. त्यांच्या मान्यतेनेच पत्रिका छापली असून तो शिष्टाचाराचा भाग असल्याने हा वाद लवकरच संपेल - संजय सोनवणे, सदस्य, संयोजन समिती.

नाशिक - मुंबई येथे होणा-या व पालकमंत्री गिरीष महाजन मुख्य संयोजक असलेल्या 'मेक इन नाशिक'च्या कार्यक्रमाची जोरदार तयारीही सुरु आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्य उपस्थिती म्हणून सध्या तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाव छापले आहे. त्यामुळे भाजपची उद्योग आघाडी व अन्य संस्थांच्या पदाधिका-यांनी यावर तक्रारी करीत आदळआपट सुरु केली आहे. त्यामुळे एक नवा वाद उफाळला आहे.

'मेक इन नाशिक' या कार्यक्रमपत्रिकेत प्रमुख उपस्थितांमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाव छापण्यात आले. त्यामुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत भाजपच्या विविध अंगीकृत संघटना तसेच उद्योग आघाडीने याबाबत पालकमंत्री व पक्षाकडे तक्कार केली आहे. पालकमंत्री महाजन यांनी याविषयी काहीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे हा वाद किती ताणला जातो या विषयी उत्सुकता आहे. यापूर्वीही आदिवासी विकास विभागाच्या पुरस्कार समारंभाच्या पत्रिकेत असा प्रकार झाल्याचा वाद ताजा आहे.   

मुंबईत महिनाअखेरीस होणाऱ्या या कायर्क्रमाचे संयोजक राज्य शासनाचा उद्योग विभाग, निमा आणि क्रेडाई या तीन संस्था आहेत. पालकमंत्री गिरीष महाजन त्याचे मुख्य संयोजक आहेत. अर्थातच भाजप सत्ताधारी असल्याने आणि छगन भुजबळ 'ईडी' च्या कारवाईमुळे कारागृहात असल्याने त्यांचे नाव 'मुख्य उपस्थिती' असे छापल्याने हा वाद उफाळला आहे. मात्र, शासनही संयोजक असल्याने त्याचे सर्व कामकाज जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली होते. शिष्टाचार म्हणून सर्व विद्यमान आमदारांची नावे पत्रिकेत टाकणे आवश्यक आहे. त्यात श्री. भुजबळ ज्येष्ठ आमदार व माजी उपमुख्यमंत्री असल्याने त्य़ांचे नाव अग्रस्थानी समाविष्ट केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार व त्यांच्या सहका-यांचे या खुलाशाने समाधान झालेले नाही. त्यांच्या तक्रारी कायम असल्याने कायर्क्रमा आधीच 'मेक इन नाशिक' हा कार्यक्रम चर्चेत आला आहे.

संबंधित लेख