bhujbal`s mind with us : Prakash ambedakr | Sarkarnama

छगन भुजबळ शरीरानेच राष्ट्रवादीत; मनाने वंचित आघाडीत : आंबेडकर

अमोल कविटकर
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यामुळे साहजिकच राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे केवळ शरीरानेच राष्ट्रवादीत असून ते राष्ट्रवादी सोडणार नाहीत, मात्र त्यांचे मन वंचित आघाडी आणि ओबीसींमध्ये आहे", असे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

वांद्रे येथील एमइटीच्या कार्यालयात भुजबळ-आंबेडकर यांची दीड तास चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर 'सरकारनामा'शी बोलत होते. भुजबळ यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतलेली असली तरी त्यात विविध राजकीय अंगाने सखोल चर्चा झाली. वंचित आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या गळाला लागावेत, यासाठी  'भुजबळास्त्र' वापरल्याचे बोलले जात आहे. दीड तास झालेल्या या दीर्घ चर्चेत दोघांनाही बहुजन राजकारण, आरक्षण आणि निवडणुका हे विषय होते.

भुजबळ यांनी बहुजन मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी एकत्र येण्यास सुचविले असल्याचेही समजले, मात्र यावर आंबेडकर यांनी चर्चा झाली नसल्याचे म्हटले. याविषयी 'सरकारनामा'ला माहिती देताना आंबेडकर म्हणाले, "भुजबळ यांच्याकडून आमच्या वंचित आघाडीची आणि ओबीसींच्या राजकारणावर सविस्तरपणे चर्चा झाली. ते सध्या राष्ट्रवादी सोडणार नसले तरी मनाने पूर्णपणे आमच्यासोबत आहेत. शिवाय वंचित आघाडीच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादावर भुजबळ आनंदी आहेत".

काँग्रेस आघाडीसोबत वंचित आघाडीने यावे, अशी भुजबळ यांच्याकडून विचारणा झाली का? असे विचारले असता, यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आंबेडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आगामी काळात रोखण्यासाठी काय करता येईल, यावर आमची सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांना वंचित आघाडीत येण्याचे आवाहन केले, मात्र ते काय करतील हे माहिती नाही."

संबंधित लेख