bhujbal attack on bacchu kadu | Sarkarnama

अधिवेशनात मौनी असलेल्या बच्चू कडू यांना चांदवडमध्येच का कंठ फुटला ? : समीर भुजबळ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नाशिक : सरकारमुळे कांदा दर कसे पडले याचा पर्दाफाश करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्येच छगन भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली होती. सरकारला धारेवर धरले होते. आमदार बच्चू कडू तेव्हा तोंडावर व डोळ्यावर पट्टी बांधुन गप्प होते. चांदवडला आल्यावरच त्यांना का कंठ फुटला?. अपूर्ण माहितीच्या आधारे कडूंनी जनतेची दिशाभूल करु नये असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे. 

शहरातील कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी भुजबळ-विखे पाटील यांनी लक्षवेधी मांडली असा आरोप बच्चू कडू यांनी चांदवड येथे केला होता. त्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या. यासंदर्भात श्री. भुजबळ यांनी कडू लोकांची दिशाभूल करीत असल्याचे म्हटले आहे. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, कांदा प्रश्नावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना सरकारी यंत्रणेने चुकीची छापली. त्यावर सभागृहात भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सभागृह डोक्‍यावर घेतले होते. यावेळी सभागृहामध्ये कांदा प्रश्नावर चर्चा होत असतांना बच्चू कडू कुठे गेले होते?. 

अधिवेशन काळात कांदा दराने निच्चांकी पातळी गाठली. शेतकरी मोठ्या अडचणीत होते. मात्र त्यावेळी आमदार कडू यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सभागृहात अवाक्षरही न काढणाऱ्या बच्चू कडूंना आता कंठ फुटला असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ साहेबांच्या मतदार संघामध्ये असलेल्या लासलगाव येथून देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन आणि निर्यात होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे आणि शासन दरबारी मांडणे हे भुजबळ साहेबांना चांगले माहिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना जास्तीचे ज्ञान बाहेरच्यांनी शिकविण्याची गरज नाही. कांदा दर कोसळल्यानंतर राज्यात सर्वात आधी भुजबळांनी अधिवेशनात चर्चा घडवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने रेल रोको, रास्ता रोको आणि रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी नागरिकांना मोफत कांदे विक्री करुन या प्रश्नातकडे लक्ष वेधले. 

संबंधित लेख