bhosari-assembly-fight | Sarkarnama

तयारी विधानसभेची : भोसरीत महेशदादांविरुद्ध दत्ताकाका, की विलासशेठ?

उत्तम कुटे
मंगळवार, 14 मे 2019

चिंचवडप्रमाणे भोसरीतही भाजपचा विधानसभेचा उमेदवार ठरल्यात जमा आहे. विद्यमान आमदार, शहराचे उपकारभारी पैलवान महेशदादा लांडगे हेच पुन्हा आखाड़्यात उतरणार आहेत. त्यामुळे आता फक्त प्रतिक्षा ही की त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीकडून कोण मैदानात उतरतो याचीच आहे. त्यात अग्रक्रमाने भोसरीचे पहिले आमदार विलासशेठ लांडे-पाटील व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांची नावे आघाडीवर आहेत. 

पिंपरीः चिंचवडप्रमाणे भोसरीतही भाजपचा विधानसभेचा उमेदवार ठरल्यात जमा आहे. विद्यमान आमदार, शहराचे उपकारभारी पैलवान महेशदादा लांडगे हेच पुन्हा आखाड़्यात उतरणार आहेत. त्यामुळे आता फक्त प्रतिक्षा ही की त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीकडून कोण मैदानात उतरतो याचीच आहे. त्यात अग्रक्रमाने भोसरीचे पहिले आमदार विलासशेठ लांडे-पाटील व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांची नावे आघाडीवर आहेत. 

तूर्त राजकीय स्थिती पाहता लोकसभेची महायुती व आघाडी ही विधानसभेलाही कायम राहील, अशीच चिन्हे आहेत. तसे झाले, तर यावेळी गतवेळसारखी बहुरंगी लढत न होता ती थेट दुरंगी भाजप (युती) व राष्ट्रवादी (आघाडी) अशीच होण्याची शक्यता आहे. लोकसभेलासुद्धा नुकतीच ती अशीच झालेली आहे. फक्त भोसरीचा समावेश असलेल्या शिरुरला शिवसेनेचा उमेदवार होता.तर, विधानसभेला आता तो भोसरीत भाजपचा असणार आहे.मात्र,दोन्ही वेळेला प्रतिस्पर्धी हे राष्ट्रवादीच आहेत. 

लांडे यांना संधी मिळाली,तर ही लढत मामा, भाचे अशी भोसरी गावातच होईल. जर, साने उमेदवार असतील, तर, लढत भोसरी विरुद्ध चिखली अशी होणार आहे. साने व लांडे या दोघांनीही आपण  इच्छूक असल्याचे `सरकारनामा'ला सांगितले.

लोकसभेची तयारी सुरु करून ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने लांडे यांचा विधानसभेला नक्की विचार होईल, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते तयारीलाही लागले आहेत. गतवेळी लांडेंना  तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती. पराभव झाल्याने 2014 पासून ते राजकारणात सक्रिय राहिले नव्हते, या बाबी त्यांच्या विरोधातील आहेत. मात्र, भोसरीकर असल्याने प्रतिस्पर्धी लांडगेंच्या मतांचे विभाजन होईल, ही लांडेंची जमेची बाजू आहे. दुसरीकडे साने यांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. 2014 ला लांडगेंना नगरसेवकाचा आमदार करण्यात त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. परिणामी लांडगेंचा पूर्ण गेमप्लान त्यांना ठाऊक आहे. आक्रमक, अभ्यासू या बाबी त्यांच्या जमेच्या आहेत. 

शिरुरमधून डॉ. कोल्हे हे पक्षाचे उमेदवार निवडून आले, तर त्यांच्या प्रचाराची धूरा सांभाळलेल्या साने वा लांडे या दोघांपैकीच एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून काका की शेठ वा ऐनवेळी तिसराच उमेदवार हे नक्की होत नसताना भाजपचं,मात्र भोसरीत उमेदवारीचं अगोदरच ठरलंय. लांडगे हेच त्यांचे उमेदवार असणार आहेत. लोकसभेच्याही आधीपासून त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केलेली आहे. नुकतेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी लांडगेंच्या वॉररुमचे उदघाटन केले. त्यावेळी त्यांनी लांडगे हेच भाजपचे उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत. 

संबंधित लेख