रामबाग च्या निमित्ताने नाईक निंबाळकर व छत्रपती भोसले घराणे एकत्र

रामबाग च्या निमित्ताने नाईक निंबाळकर व छत्रपती भोसले घराणे एकत्र

सातारा : "रामबाग' या निवासी व व्यावसायिक संकुलाच्या भूमीपूजन कार्यक्रम आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले वगळता फलटणचे नाईक-निंबाळकर व साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती भोसले घराण्यातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कुटुंबियांचे नाव नव्हते पण कार्यक्रमात मात्र, त्यांची आठवण आवर्जून झाली. पण त्यांचा नामोल्लेख टाळत सर्वांनी त्यांना चिमटे घेतले. 

"फलटण व सातारा बदलते आहे. सामाजिक परिस्थिती बदलत आहे. बदलत्या सामाजिक स्थितीत राजकिय सत्तेच्या साठमारीत नाईक निंबाळकर व श्रीमंत छत्रपती भोसले राजघराण्यातील नाते व प्रेम टिकून राहावे', अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "या कार्यक्रमाला कोणी राजकीय वळण देऊ नये. पुरातन अशा जब्रेश्‍वर मंदिराच्या परिसरात रामबाग ही इमारत होणार आहे, सर्व प्रशासकीय मंजुरीनंतर ही इमारत उभी राहात आहे. श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले यांच्या पत्नी कै. श्रीमंत छत्रपती आदितीराजे भोसले या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. त्यांच्या पश्‍चात श्रीमंत छत्रपती अन्शुमनराजे भोसले यांच्यावर लक्ष ठेवत व्यवसायात जम बसविण्याचे काम श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले यांनी केले आहे.' 

" आजच्या काळात असे उदाहरण क्वचित पहायला मिळते. या कार्यक्रमाची फारशी कल्पना नव्हती. थोडे लवकर समजले असते तर फलटणच्या राजवाड्यात नाईक निंबाळकर आणि श्रीमंत छत्रपती भोसले घराण्यांचे गेट टु गेदर आयोजित केले असते. पण नेमका श्रावण महिन्याचा अडथळा आला असता. आपण शाकाहारीच आहोत पण या महिन्यात गेट टू गेदर करणे आपल्या परंपरेला शोभले नसते,"असे म्हणून रामराजेंनी हश्‍या पिकविला. 

घरातल्यांना आमंत्रणाची काय गरज... 
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले," घरातल्या माणसांना आमंत्रणाची गरज नसते ते आपसुक येतात. आमचे मामा व आत्या नैनितालहून खास आशिर्वाद देण्यासाठी फलटणला आले आहेत', असा चिमटा त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता काढला. 

रघुनाथराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, "जे नात्यापासून दूर राहतील, त्यांना सुबुध्दी द्यावी. राजकारण, आमदारकी, खासदारकी पाच वर्षापूरती असते, हे त्यांना समजो. जिव्हाळ्याच्या प्रेमात ते सामील होवोत . राजकारण हे पुढाऱ्यांच्यात होते, नातेवाईकांच्यात राजकारण नसते. तेरा पिढ्यात नऊ वेळा नाईक-निंबाळकर आणि छत्रपती भोसले घराण्याची सोयरीक आहे. श्रीमंत छत्रपती अन्शुमनराजे भोसले हे आमच्या दोन घरातील प्रेमाचा नाजुकसा दुवा आहे. छत्रपती आदितीराजेनंतर श्रीमंत छत्रपती अन्शुमनराजेंना विक्रमसिंहांनी खुप जीवापाड सांभाळले आहे. आक्कासाहेबांना विक्रमसिंहांचा खुप अभिमान आहे. ' 

रघुनाथराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, " नाईक निंबाळकर व छत्रपती भोसले घराण्याचा जिव्हाळा आम्ही लहानपणापासून पहात आहोत. साताऱ्यात छत्रपती भोसलेंच्या राजवाड्यावर आम्ही लहानपणी जात असू. सातारच्या राजवाड्यावर यायला आम्हाला कोणाचीही अपॉईंटमेट घ्यावी लागत नाही. आम्ही थेट राजवाड्यात जाऊ शकतो.' 

"मॉंसाहेबांना फलटणविषयी एक वेगळीच आस्था होती. फलटणच्या राजवाड्यात मॉंसाहेबांनी लिहिलेली पत्रे आहेत. त्याच्या एका पत्रात माहेर काय असते हे आम्हाला फलटणला आल्यावर समजले, असा उल्लेख आढळतो. शाहू महाराज पुण्यात शिकत असताना त्यांचे लोकल गार्डीयन म्हणून श्रीमंत मालोजीराजे यांचेच नाव होते", असेही रघुनाथराजेंनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com