bhor-razia-patel-criticizes-government | Sarkarnama

मुस्लिम मंत्री शोधा आणि बक्षीस मिळवा : रझिया पटेल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नसल्याचे सांगत संमेलनाध्यक्ष रझिया पटेल यांनी मुस्लिम मंत्री शोधा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा करायला हरकत नसल्याचे सांगितले.

भोर (जि. पुणे) : सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नसल्याचे सांगत संमेलनाध्यक्ष रझिया पटेल यांनी मुस्लिम मंत्री शोधा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा करायला हरकत नसल्याचे सांगितले. धर्मावर राजकारण करणाऱ्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी ठणकावले.

भोर (जि. पुणे) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर चौथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ``भारतात विविधतेबरोबर असलेली जातीयवादाची विषमता नष्ट करण्याचा आशावाद साहित्य संमेलनातून लोकांसमोर येतो आणि अशा विचारांमधूनच लोकशाही बळकट होते.'' 

रझिया पटेल यांनी संमेलनाच्या शिवराय ते भिमराय या ब्रिदवाक्याबद्दलची माहिती सांगताना छत्रपती शिवाजी महाराज व भिमराव आंबेडकर हे दोघेही जातीयवादाच्या विरोधात होते, असे सांगत अनेक आज्ञापत्रांचे दाखले दिले. 

जातीयवाद, धर्मवाद, संस्कृतीवाद आणि राष्ट्रद्रोही हे लोकशाहीचे धोके असून त्यांना नष्ट करण्यासाठी संत कबीर, फुले, शाहू व आंबेडकरांच्या विचारांचा जागर करायला हवा असल्याचेही त्यांनी सांगितले. 
   
रविवारी (ता.२५) दुपारी झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, पंचायत समितीच्या सभापती मंगल बोडके, संय़ोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, डॉ. रोहिदास जाधव, प्रसन्नकुमार देशमुख आदींसह अनेक साहित्यप्रमी नागरिक उपस्थित होते.
 
संमेलनात गायक अनिरुद्ध बनकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानोबा घोणे यांना तालुकास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कवी उद्धव कानडे यांनी ज्येष्ठ साहित्यीक उत्तम कांबळे यांची प्रकट मुलाखत घेतली. 

मुलाखतीत उत्तम कांबळे यांनी आपला जीवनपट उलगडून पूर्वीच्या व सध्याच्या पत्रकारितेबद्दल आणि साहित्याबद्दल आपले मत व्यक्त केले. संमेलनाच्या सूर्यफूलयाशिवाय अनिरुध्द बनकर यांचा मी वादळवारा हा गीतांचा आणि शाहीर रंगराव पाटील यांचा स्वराज्यधर्म हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
फोटो पाठविला आहे

संबंधित लेख