राहुल गांधी यांच्या वलयामुळे भिवंडीत कॉंग्रेसला यशाचा "हात'

राहुल गांधी यांच्या वलयामुळे भिवंडीत कॉंग्रेसला यशाचा "हात'

मुंबई : भिवंडी महापालिकेची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली असे आता जाहीर करायला हरकत नाही. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी 23 प्रभागांतून 90 जागांसाठी 560 उमेदवार आपले नशीब आजमावत होते त्यापैकी 86 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. यंदा भिवंडीमध्ये चार प्रभागांच्या पॅनेल पद्धतीनं होणारी पहिलीच निवडणूक होती. विजयी मिरवणुकीवरही भिवंडीत बंदी घातली आहे. 


निवडणूक काळात प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे अपेक्षेप्रमाणे मतदान प्रक्रिया पार पडली पण निकाल मात्र अनपेक्षितच लागले आहेत. भिवंडीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची खूप सारी कारणे आहेत. 

भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने चांगलेच यश खेचून आणले आहे. 2012 साली झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. आताच्या निवडणुकीत कॉंग्रेसने 46 जागा जिंकत सगळ्यांनाच चकित केले आहे.

भिवंडीसारख्या मुस्लिम बहूल भागात कॉंग्रेसला त्या मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. भिवंडीमध्ये समाजवादी पक्षाला व एमआयएमला पारंपरिक मुस्लिम मतदार यावेळी कौल देईल असा राजकीय पंडितांचा अंदाज होता. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होत भिवंडीत भाजपच सत्तेत येणार असल्याचे दावेही केले जात होते. मात्र भिवंडीतल्या मतदारांनी भाजपच्या मनसुब्यांवर चांगलेच पाणी फेरले आहे. भाजपला गेल्या वेळी म्हणजे 2012 साली 8 जागा मिळाल्या होत्या यात जरी दुप्पटीपेक्षा वाढ होत 20 जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी भाजपच्या विजयाचा झंझावात भिवंडीकरांनी रोखला आहे असेच म्हणावे लागेल. 


राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेत नंबर एकवर गेलेल्या भाजपला भिवंडीतही चांगल्या निकालाची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. भिवंडी सारख्या मुस्लिमबहूल महापालिकेत एमआयएमला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे भिवंडीतील संभाव्य ध्रुवीकरण टाळले. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी चांगलाच करिष्मा करतील अशी अपेक्षा होती. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी झाली होती. मात्र, सपाचा सपशेल पराभव झाला आहे. 

2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सपाला 17 जागा मिळाल्या होत्या. यावेळी समाजवादी पार्टीने 36 जागा लढवून केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीत महापौर ठरवण्यामध्ये सपाने निर्णायक भूमिका निभावली होती.

पहिल्या अडीच वर्षासाठी महापौर म्हणून कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना सपा आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या अडीच वर्ष महापौरपदासाठी तुषार चौधरी या शिवसेनेच्या उमेदवाराला सपा आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. भिवंडी येथे शिवसेना हा सपाचा पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी आहे. परंतु शिवसेनेच्या उमेदवाराला महापौर बनवल्याने मुस्लिम मतदार सपावर नाराज होता.

मात्र सपापेक्षा समर्थ पर्याय म्हणून मतदारांनी कॉंग्रेसच्या पदरात आपले दान टाकले. कॉंग्रेसनेही शिवसेनेला मदत केली असली तरीही कॉंग्रेस आज नंबर एकचा पक्ष बनला आहे. आणि कॉंग्रेसचाच महापौर भिवंडी महापालिकेत असणारे चित्र स्पष्ट झाले आहे. 


सपानंतर सगळ्यात जास्त फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीने स्वबळावर 33 जागा लढवल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीचा एकही उमेदवार यावेळी निवडून आलेला नाही. 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला हा एक इशाराच मिळाला असून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते चांगलेच हादरले आहेत.

प्रभाग 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील, सविता खोलेकर आणि नितीन पाटील विजयी झाले. कोणार्क विकास आघाडीलाही आपल्या गेल्या वेळी मिळालेल्या सहा जागापैकी दोन जागावर पाणी सोडावे लागले आहे. तर आरपीआयचाही गेल्यावेळच्या चार जागांवरून तीन जागांवर घसरण झाली. 


मुस्लिम मतदारांची कॉंग्रेसला साथ 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपामुळे कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात तीन वेळा हजेरी लावावी लागली होती. राहुल गांधी यांचा हा भिवंडी दौराच कॉंग्रेस पक्षाची मरगळ दूर करायला कारणीभूत ठरला असे मानायला काहीच हरकत नाही. कारण देशभरात पराभवाचा सामना करावा लागलेल्या कॉंग्रेसला भिवंडीतील मतदारांनी हात दिला आहे.

मुस्लिम मतांचा कल पुन्हा कॉंग्रेसकडेच दिसून आला. भाजपचा देशभरातला झंझावात भिवंडीत मात्र दिसून आला नाही. कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शोएब अशफाक खान यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसने 65 जागा लढवल्या होत्या त्यापैकी कॉंग्रेसने 46 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप व रिपाइ आघाडीने 57 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी भाजपला 20 व आरपीआयला 3 जागा मिळाल्या, तर शिवसेनेनेही 55 जागा लढवल्या होत्या त्यापैकी केवळ 14 जागा शिवसेनेच्या जिंकून आल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com