bhilare guruji stand | Sarkarnama

"भाकरीची शपथ...मरेपर्यंत यशवंतराव चव्हाणांची साथ सोडणार नाही'! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 जुलै 2017

शरद पवार यांनी यावेळी गुरुजींची मुलगा शिवाजीराव यांच्या तब्बेतीची विचारपूस करून सुरेंद्र, अशोकराव या मुलांबरोबरच पुतणे राजेंद्र, विजय, दीपक नातू जावळी बॅंकेचे अध्यक्ष विक्रम, प्रशांत, विशाल, राहुल, राकेश, विपुल, प्रफुल्ल यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून सांत्वन केले. 

सातारा : भि. दा. भिलारे गुरुजी हे यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावान अनुयायी होते. राजकीय स्थित्यंतरातही गुरुजींनी यशवंत विचार सोडला नाही. वयाच्या 98 व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती, सामाजिक आस्था आणि भान कायम होते. गुरुजींच्या जाण्याने एका त्यागी व्यक्तिमत्वाला समाज मुकल्याचे भावोद्‌गार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले. 

भिलारे गुरुजींच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार आज सकाळी अकरा वाजता भिलार (ता. महाबळेश्‍वर) मध्ये आले होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अनिल पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, सरचिटणीस सुधीर धुमाळ, राजेंद्रशेठ राजपुरे, राजेंद्र लावंघरे, फिरोज पठाण, प्रवीणशेठ भिलारे, गणपत पारठे, अनिल भिलारे, शशिकांत भिलारे, अमोल भिलारे, सुशील गोळे आदी उपस्थित होते. 

गुरुजींच्या आठवणींना उजाळा देताना शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, दिल्लीत यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच बिनसलं होतं. त्यामुळे नाराज झालेले श्री. देसाई दिल्लीहून तडक साताऱ्याला आले. भिलारे गुरुजींना गुरुजींना आपल्याकडे वळविण्यासाठी देसाईंनी गुरुजींशी संपर्क साधून आपल्याकडे जेवायला बोलविले. गुरुजी जेवण करित असतानाच देसाईंनी महाराष्ट्रात सातारा काय, सांगली काय आणि कोल्हापूर काय सगळे आमदार आपल्याच बरोबर आहेत. मी मनात आणलं तर सगळ संपून जाईल. जाऊन सांगा तुमच्या यशवंतरावांना... तुमचं आता काही खरं नाही म्हणून. यावेळी गुरुजी भाकरी खात होते. हातात घेतलेला घास खाली ठेवत गुरुजी म्हणाले, मी तुमचं अन्न खातोय. पण या भाकरीची शपथ घेऊन सांगतो. मरेपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडणे आपल्याला जमणार नाही' अशी सडेतोड भूमिका गुरूजींनी घेतली. यशवंत विचार जपण्यासाठी टोकाची भूमिका घेण्यातही गुरुजी डगमगले नाहीत. 

भिलारे गुरुजी वाढत्या वयातही पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असल्याचे सांगून शरद पवार यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या जबाबदारीच भान राखत गौरव केला. बाळासाहेब भिलारे यांनी गुरुजींच्या ठाम भूमिकेचा उल्लेख करताना शरद पवार आणि गुरुजींच्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करून दिली. पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून एस कॉंग्रेस च्या माध्यमातून पुलोद सरकारचा प्रयोग केला. यशवंत विचारांच्या आणि तितक्‍याच शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या गुरुजींना यशवंराव चव्हाण आणि पवार साहेब यांची ताटातूट पाहावत नव्हती. म्हणून गुरुजींनी पवार साहेबांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी आता खूप पुढे गेलो आहे. आता मला माघारी येता येणार नाही, अशी अडचण पवार साहेबांनी सांगितल्यावर गुरुजींना चव्हाण साहेब आणि पवार यांच्यातील दुरावा सहन झाला नाही. त्यांनी डोक्‍यावरील टोपी काढली आणि पवार साहेब पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतेपर्यंत मी टोपी घालणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा केली. यानंतर तब्बल चार वर्षांनी 1986 साली राजीव गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हाच गुरुजींनी डोक्‍यावर गांधी टोपी घातली. गुरुजींच्या या वेगळ्या अनुभवाच्या आठवणीला पवारांनी दाद दिली. 

 

संबंधित लेख