bhilar | Sarkarnama

भिलारला साहित्यिक, राजकारण्यांची मांदियाळी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

भिलारसारखी राज्यात आणखी पुस्तकांची गावे करण्याचा आमचा मानस आहे. केवळ पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या पुस्तकांच्या गावामुळे वाचनाची गोडी लागेल. त्यामुळे पर्यटनाबरोबरच वाचन संस्कृती वाढण्यास मदत होणार आहे. 
-विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

सातारा : प्रत्येक रस्त्यावर पुस्तकांची ओळख सांगणारे फलक, रांगोळ्या, साहित्यिकांसह पुस्तकप्रेमींनी भिलार गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे. पुस्तकाचे पहिले गाव म्हणून भिलारचे बारसे झाले. या सोहळ्यासाठी पुस्तकप्रेमींसह साहित्यिक व राजकारण्यांची मांदियाळी पहायला मिळाली. 

सर्वसामान्य माणसांपासून ते अगदी दिग्गज साहित्यिकांनाही भिलारची भुरळ पडली. गावातील 25 घरांत सुरू केलेली ग्रंथालये पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातून पुस्तकप्रेमींनी हजेरी लावली. सकाळपासूनच भिलार गावात पुस्तकप्रेमींची गर्दी झाली होती. पाचगणीपासूनपासून रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या स्वागताचे फ्लेक्‍स तसेच ग्रंथालय स्थापन केलेल्या घरावर पुस्तकांची माहिती देणारे भित्तिचित्रे लक्ष वेधून घेत होते. गावातील प्रत्येक घराची भिंत पुस्तकांची ओळख सांगत होती. 

दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ग्रंथालय स्थापन केलेल्या घरांना भेट देऊन प्रमाणपत्रांचे वाटप केले. खुद्द शिक्षणमंत्री घरी आल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. 

भिलारच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस स्वागताचे लावण्यात आलेले राजकीय पक्षाचे फ्लेक्‍स लक्षवेधी ठरत होते. यामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पार्टी ध्वज व फ्लेक्‍सचा समावेश होता. त्यामुळे कार्यक्रम पुस्तकांचा की भाजपचा असा प्रश्‍न उपस्थित होत होता. 

 

संबंधित लेख