bhilar | Sarkarnama

भिलारमध्ये एकीचे उधाण ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

पुस्तकाचे गाव म्हणून नावारूपास येणाऱ्या भिलारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भुरळ पडली आहे. येत्या गुरुवारी (ता. 4) ते भिलारला भेट देण्यासाठी येत आहेत.

सातारा : पुस्तकाचे गाव म्हणून नावारूपास येणाऱ्या भिलारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भुरळ पडली आहे. येत्या गुरुवारी (ता. 4) ते भिलारला भेट देण्यासाठी येत आहेत. यानिमित्ताने गावाचे नाव राज्य नव्हे तर देशपातळीवर पोचणार असल्याने येथील सर्वपक्षीय पदाधिकारी हातात हात घालून गावासाठी झटू लागले आहेत. 

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील भिलार हे छोटेसे गाव. या गावाची आजपर्यंतची ओळख ही स्ट्रॉबेरी शेती करणारे गाव अशीच होती. या गावातूनच स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशनची स्थापना होऊन महाबळेश्‍वरची लाल टुचूक स्ट्रॉबेरी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागली. पण केवळ स्ट्रॉबेरीचे गाव इतकीच ओळख येथील ग्रामस्थांना अपेक्षित नव्हती. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून ओळख करून देण्याचा संकल्प केला. त्यासाठी गावांतील सर्वांशी संवाद साधून याची संकल्पना मांडली आणि ती सर्वांनी उचलून धरली.

गावात प्रत्येक घर व चौकात ग्रंथालय उभारले गेले आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह विविध सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनीही पुस्तकांच्या रूपाने मदत केली आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्ती झटून काम काम करू लागले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह इतर पक्षातील पदाधिकारी यांनी आपले पक्ष व पद आणि मतभेद विसरून एकमेकांच्या हातात हात घालून कामाला सुरवात केली आहे. बघता बघता गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने व पुस्तकाचे गाव ही वेगळी ओळख निर्माण होत असताना गावातील एकीला उधाण आल्याचे चित्र आहे. 

संबंधित लेख