नेतृत्व घडविणारा कारखाना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर - विजय अग्रवाल

नेतृत्व घडविणारा कारखाना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर - विजय अग्रवाल

कार्यकर्ता जोडत पक्ष संघटन अधिक मजबुत करणाऱ्या भाऊसाहेबांनी आमदार, खासदार, विरोधी पक्षनेता, कापूस पणन महासंघाचे मुख्य प्रशासकपद भुषविले. यासोबतच पक्ष संघटनेत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक महत्वपुर्ण पदाची जबाबदार यशस्वीपणे पार पाडली.

अकोला : राजकीय जीवनात गेल्या 32 वर्षांच्या कालखंडात अनेक चढ-उतार पाहिलेत. मात्र, प्रत्येक क्षणाला कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यातील नेतृत्वाला आकार देण्याची क्षमता कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यातच आहे. बाळापूर तालुक्‍यातील माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता निमकर्दा या छोट्याशा गावचा भाजपचा शाखाध्यक्ष होते तिथपासून ते अकोल्याचा महापौर बनविण्यात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांचा आदर्श मानतच माझ्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी "सरकारनामा' शी बोलतांना सांगितले. फुंडकर यांचा आजा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने अग्रवाल यांनी फुंडकर यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. 

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्‍यातील नारखेड या छोट्याशा गावात जन्मलेल्या पांडुरंग फुंडकर यांची जनसंघ ते भाजप अशी राजकीय जीवनाला सुरूवात झाली. प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीसाठी धावून येणाऱ्या पांडुरंग फुंडकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठ्या भावाची भूमिका बजावली. त्यामुळेच शेतकरी, कामगार, मजुर आणि पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या पांडुरंगा ला जनमानसात "भाऊसाहेब' ही उपाधी मिळाली. भाऊसाहेबांबद्दल सांगताना अग्रवाल म्हणाले, ""बाळापूर तालुक्‍यातील निमकर्दा या छोट्याशा गावचा मी रहिवासी. भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांच्यासोबत पक्षाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा 1980 मध्ये भाऊसाहेबांची भेट झाली. त्यांचे वक्तृत्व कार्यकर्त्याला आपलेसे करून घेण्याचे कौशल्य पाहून मी भारावुन गेलो. त्यानंतर पक्षाच्या बैठका, कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून भाऊसाहेबांशी संपर्क वाढला. कार्यकर्ता जोडत पक्ष संघटन अधिक मजबुत करणाऱ्या भाऊसाहेबांनी आमदार, खासदार, विरोधी पक्षनेता, कापूस पणन महासंघाचे मुख्य प्रशासकपद भुषविले. यासोबतच पक्ष संघटनेत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक महत्वपुर्ण पदाची जबाबदार यशस्वीपणे पार पाडली. हे करीत असतांना कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कामही त्यांनी केले. माझ्या राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले. ते दिवस आयुष्यातील खूप ताण-तणावाचे आणि दुःखाचे होते. मात्र, प्रत्येक वेळी भाऊसाहेब खंबीरपणे पाठिशी उभे राहत माझ्यासह कुटूंबातील सदस्यांना वडीलधारी म्हणून त्यांनी धीर दिला. सुखात तर सर्वच जण असतात, पण दुःखात कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीलेला नेता म्हणून भाऊसाहेबांना मी पाहिले आहे. कार्यकर्त्यांकडून कधी चूक झाली तर त्याला रागावत खडे बोल सुनावण्यातही भाऊसाहेब हयगय करीत नाहीत. त्यांचा चिडलेला अवतार पाहून अनेकांची घाबरगुंडी उडते. पण कार्यकर्त्याच्या चुक लक्षात आल्यावर त्याला तेवढ्याच आपुलकीने जवळ घेण्याचा त्यांचा स्वभावगुण आहे.'' 

त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगताना ते म्हणाले, "" सर्वांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करण्याच्या वृत्तीमुळे स्व:पक्षीयांप्रमाणेच विरोधी पक्षातील अनेक नेते त्यांचा आदर करतात. वऱ्हाडाच्या राजकारणात "सबका साथ, सबका विकास' हे भाजपचे धोरण तळागाळापर्यंत पोहचविण्यात भाऊसाहेब फुंडकरांचा सिंहाचा वाटा आहे. खासदार म्हणून त्यांची जिल्ह्यातील कारकिर्द चांगलीच गाजली. तीच परंपरा आज खासदार संजय धोत्रे अखंडपणे पुढे नेत आहेत.

राज्यात भाऊसाहेब कृषीमंत्री म्हणून शेतकरी हिताचे निर्णय घेत असून केंद्रात संजय धोत्रे यांच्या रुपानेही त्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केंद्रात कायम ठेवले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला शाखाध्यक्ष पदापासून ते अकोल्याच्या महापौरपदी विराजमान करण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांनाच आहे.

माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी विविध पदांवर बसविले. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व गुण घडविणारा कारखाना असल्याचे विजय अग्रवाल म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com