Bharip-Bahujan Mahasangh Committee | Sarkarnama

भारिप-बहुजन महासंघाची सुकाणू समिती; लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी यंत्रणा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

भारिप-बहुजन महासंघाने आगामी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीकडे निवडणुकीच्या नियंत्रणाची जबाबदारी राहणार आहे.

अकोला : भारिप-बहुजन महासंघाने आगामी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीकडे निवडणुकीच्या नियंत्रणाची जबाबदारी राहणार आहे. भारिप-बमसंची काँग्रेससोबत युती होणार किंवा नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत भारिपने मंगळवारी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. 

अकोला लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघासोबतच जिल्हा परिषदेसाठी ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, ज्ञानेश्‍वर सुलताने, वंदना वासनिक, डॉ. अशोक गाडगे, डॉ. रविंद्र मोरे, राजेंद्र पातोडे, ॲड. धनश्री देव, राजेश इंगळे यांचा समावेश आहे. आमदार बळीराम सिरस्कार आणि माजी हरिदास भदे हे समितीचे सल्लागार असतील.

याशिवाय वाशीम जिल्हा परिषदेसाठी समिती निर्माण करण्यात येणार असून, त्याचे अधिकार वाशीम जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी व न निरीक्षक डॉ. नरेश इंगळे यांना देण्यात आले आहेत. समितीची पहिली बैठक २० आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला स्वतः अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.   

संबंधित लेख