भंडारा जिल्ह्यात  वाळू तस्करांना भाजप आमदार वाघमारेंचे अभय ?

मोहाडी तालुक्‍यातील रोहाजवळ वाळूतस्करांनी १ ऑगस्ट रोजी पोलिस पथकावर हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केले. या प्रकरणीसर्व आरोपी फरार असून ऑगस्ट महिना संपत आला असून अजूनही पोलिस त्याचा शोध घेत आहे.
Bhandara Mla waghmare
Bhandara Mla waghmare

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करांना भाजपचे आमदार चरण वाघमारे संरक्षण देत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. या वादामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजप व कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. दरम्यान आमदार चरण वाघमारे  यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत .  

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी वाळूचोरी करणाऱ्या वाळूमाफियांसोबत आमदार वाघमारे यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त करीत दोषी भाजप पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सध्या या आरोपामुळे भाजप-कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे.

मोहाडी तालुक्‍यातील रोहाजवळ वाळूतस्करांनी १ ऑगस्ट रोजी  पोलिस पथकावर हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी आरोपी  असलेले भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अजूनही बेपत्ता आहेत. घटनेनंतर आमदार वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना वाळूचोरी पकडण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता .

 पोलिस  वाळू चोरांना पकडण्यासाठी  रात्रीला तिथे गेलेच कसे? त्यामुळे यांच्या मोबाईलच्या सीडीआरची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीवरून वाळूतस्करी करून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना आमदार वाघमारे पाठबळ असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.

माजी खासदार नाना पटोले यांनी वाळूमाफिया व पोलिसांना हल्ला करणाऱ्या आरोपीं विरोधात आवाज उठवला तर आमदार वाघमारेंना त्यांचा एवढा पुळका का यावा, हे मात्र कोडेच असल्याचे कॉंग्रेस नेते रमेश पारधी, गजानन झंझाड, माजी सभापती कलाम शेख, किरण अतकरी, डॉ. पंकज कारेमोरे, कमलाकर निखाडे, खुशाल कोसरे, राजेश हटवार, अनिल काळे यांनी केला आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी ,  एक ऑगस्टच्या मध्यरात्री  अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर वाळूतस्कराने  जीवघेणा हल्ला केला होता . यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते .  यावेळी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून त्यांच्या ताब्यात असलेली दोन ट्रॅक्‍टर वाळू तस्करांनी पळवून नेले होते . ही घटना बुधवारी ता. एक ऑगस्टच्या  रात्री एक वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील रोहा येथे घडली होती .

स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक बबन फुसाटे (वय 49) यांच्या नेतृत्वातील पथक  १ ऑगस्ट रोजी रोहा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, रोहा शेत शिवारात रेल्वे गेटजवळ दोन ट्रॅक्‍टरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याचे मिळाले. पोलिस पथकाने दोन्ही ट्रॅक्‍टर अडवून कारवाई केली व सदर ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई करण्यासाठी मोहाडी पोलिसात आणत होते. 

दरम्यान, वाटेतच पोलिस पथकास अडवून एम. एच. 36/ एन. 5983 क्रमांकाच्या दुचाकीने आलेल्या विश्‍वनाथ बांडेबुचे, कमलेश बांडेबुचे व अन्य दोघांनी पोलिसांशी वाद घातला. ट्रॅक्‍टर सोडण्यास नकार दिल्याने कमलेशने सहायक पोलिस निरीक्षक बबन पुसाटे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला. यावेळी पोलिस हवालदार सुधीर मडामे हे मदतीसाठी गेले असता  विश्‍वनाथ बांडेबुचे यांनी लोखंडी रॉडने वार करून दुखापत केली. तसेच पोलिस शिपाई चेतन पोटे यांच्या हातावर लोखंडी रॉड मारून जखमी केले.  

 यानंतर शासकीय पोलिस वाहनावर (क्रमांक एमएच 36/2225) दगडफेक करून नुकसान केले व पोलिसांच्या ताब्यात असलेली दोन्ही ट्रॅक़्टर पळवून नेले. जखमी पोलिसांनी घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना देऊन उपचारासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.

याप्रकरणी विश्‍वनाथ बांडेबुचे, ट्रॅक़्टर चालक जनार्दन तितीरमारे, मार्कंड बांडेबुचे, कमलेश बांडेबुचे यांच्यासह अन्य दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून ऑगस्ट महिना संपत आला असून अजूनही पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कदम करीत आहेत.

वाळूतस्कर विश्‍वनाथ बांडेबुचे हे भाजप पदाधिकारी असून आमदार चरण वाघमारे यांचे निकटवर्ती आहेत. त्यांची पत्नी विशाखा बांडेबुचे ह्या तुमसर पंचायत समितीच्या सभापती आहेत . सत्ताधारी पक्षाचे असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धाक दाखवून सर्रास अवैध वाळूची वाहतूक करीत आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच भाजप नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाई टाळण्याचा प्रयत्न सुरू आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे . 

रोहा नदीघाटावरुन अवैधरीत्या वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना महसूल विभाग झोपेत आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कारवाई करण्याचे सांगत असताना महसूल विभागाकडून कारवाई केली जात नाही. वाळूमाफियांकडून महसूल विभागाला लक्ष्मीदर्शन घडत असल्याने हा प्रकार सुरू असल्याचा चर्चा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com