भगवानगड : 30 सप्टेंबरला पंकजा मुंडेंची अग्नीपरीक्षा! 

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वादंगामुळे गतवर्षीचा दसरा मेळावा जोरदार गाजला. मेळाव्याच्या निमित्ताने वादाचा उडालेला धुरळा हाणामारीपर्यंत गेला होता. यंदा पुन्हा हा मेळावा वादाच्या दिशेने निघाला असून नामदेव शास्त्री आणि पंकजा समर्थक गतवर्षीच्या भूमिका नेटाने निभावताना दिसत आहेत. वादाचे मुद्दे काहीही असलेतरी या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजांची अग्नीपरीक्षा होणार आहे.
 भगवानगड : 30 सप्टेंबरला पंकजा मुंडेंची अग्नीपरीक्षा!
भगवानगड : 30 सप्टेंबरला पंकजा मुंडेंची अग्नीपरीक्षा!

पुणे: राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वादंगामुळे गतवर्षीचा दसरा मेळावा जोरदार गाजला. मेळाव्याच्या निमित्ताने वादाचा उडालेला धुरळा हाणामारीपर्यंत गेला होता. यंदा पुन्हा हा मेळावा वादाच्या दिशेने निघाला असून नामदेव शास्त्री आणि पंकजा समर्थक गतवर्षीच्या भूमिका नेटाने निभावताना दिसत आहेत. वादाचे मुद्दे काहीही असलेतरी या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजांची अग्नीपरीक्षा होणार आहे. 

नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगडाच्या आवारात वर्षानुवर्षे मेळावा होत होता, मात्र 2016 ला मेळावा होणार नसल्याची भूमिका नामदेव शास्त्रींनी घेतली. या पाठिमागे पंकजा यांचे नेतृत्व खच्ची करण्याचा डाव असल्याचा आरोप झाला. दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी झडल्या. गडावर गेलेल्या पंकजा समर्थकांना मारहाण झाली. आक्षेपार्ह ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्या. प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशी पंकजा गडावर दर्शनावर गेल्या असतानाही दगडफेकीचा प्रकार झाला. दुसऱ्या बाजूला गडाच्या पायथ्याला झालेल्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली. दरम्यान, यंदाचा मेळावा 30 सप्टेंबरला होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा समर्थकांनी संवादाची भाषा केली होती. पाथर्डी येथील पंकजा समर्थकांनी मेळाव्यासाठी शास्त्रींना निमंत्रण देण्याची भूमिका घेतली होती. मात्र नामदेव शास्त्रींनी आपला पुर्वीचा स्टॅंड कायम ठेवला आहे. यंदाही गडावर मेळावा होणार नाही आणि त्याला कोणत्याही व्हीआयपीला बोलाविण्यात येणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही पंकजांनी मेळावा गडाच्या पायथ्याला घ्यावा लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 

भगवानगडावर दर्शनासाठी राजकीय नेते येत, मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे हे 1995 उपमुख्यमंत्री झाल्यापासून हा गड आणि मेळावा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आला. मुंडे या मेळाव्याच्या निमित्ताने जनसमुदायाला संबोधित करायचे. सामाजिक प्रश्‍नांबरोबर भाष्य करत राजकीय संकेतही द्यायचे. त्यामुळे भगवानगडावर दसरा मेळाव्याला मुंडे काय बोलतात, याचे राज्यभरात औत्सुक्‍य असायचे. या गडाच्या विकासासाठी मुंडेंनी मोठे योगदान दिले. मात्र पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर या मेळाव्यावरुन मोठा वादंग झाला होता. गोपीनाथ मुंडे हे राजकारणासाठी गडाचा वापर करत असल्याची टीका झाली होती. या गदारोळात महंत नामदेव शास्त्री हे गोपीनाथ मुंडेंच्या बाजूने ठाम होते. मुंडेंनी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढविण्याबाबतच्या घोषणा याच गडावरुन केल्या. भगवानगडावरील मेळाव्यांना ते कन्या पंकजांना बरोबर आणत. 2013 सालच्या दसरा मेळाव्यात त्यांनी महत्त्वपुर्ण घोषणा केली. या मेळाव्याला पंकजा यांच्यासह त्यांचे पती उपस्थित होते. मी असलो नसलोतरी पंकजा येतील, असे त्यांनी सांगितले होते. आपल्या गडावरील भूमिकांचा वारसा त्यांनी पंकजा असल्याचे जाहीर केले होते. या घोषणेला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. 

गडाची मूळ भूमिका आपल्या जागी असलीतरी गेल्या 20 वर्षांच्या वाटचालीत हा गड राजकीय गड म्हणून ओळखला जावू लागला. भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण रुढ झाले होते. गडावर येऊन बोलू इच्छिणारे अनेक नेते असलेतरी त्यांना संधी मिळत नव्हती. गडावरील भक्‍त, समर्थक मुंडेंशिवाय अन्य कोणाला स्विकारतच नव्हते. त्यामुळे गोपीनाथ मुडेंनी यापुढे पंकजा गडावर येईल, ही घोषणा नामदेव शास्त्रींच्या उपस्थितीत सर्वांकडून मान्य करुन घेतली होती. गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन झाल्यानंतर भगवानगडालाही मोठा धक्‍का बसला होता. निधनाने व्यथित झालेल्या नामदेव शास्त्रींनी गडावरील स्टेज पाडून टाकले होते. गोपीनाथरावांऐवढा, त्यांच्या पात्रतेचा माणूस आता होणे नाही, या भूमिकेतून त्यांनी स्टेज पाडले होते. मुंडे आणि भगवानगडाचे नाते इतके अतूट की, गोपीनाथराव जीवंत होऊन गडावर आले अशी अफवा उठली आणि त्यांना पाहण्यासाठी हजारो लोक गडावर जमले होते! 

मुंडेंच्या मृत्यूनंतर काही दिवसांत भगवानगडावर झालेल्या मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना निमंत्रित करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते या मेळाव्याला उपस्थित होते. पुढे या मेळाव्यावरुन तक्रारी झाल्या आणि महंतांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. भगवानगडाचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागात एकतर्फी कमळ फुलले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जात असताना संत, महंतांसाठी एक वेगळे स्टेज उभारण्यात आले होते. त्या स्टेजवर पहिल्या रांगेत भगवानगडाचे महंत म्हणून नामदेव शास्त्रींना स्थान देण्यात आले होते. काही महिन्यांत राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते केले. त्यानंतर धनंजय मुंडे भगवानगडावर दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. मोठा गोंधळ माजला. यावेळी नामदेव शास्त्रींनी पंकजा समर्थकासारखीच भूमिका घेतली होती. पुढे 2015 चा दसरा मेळावा पंकजा यांच्या उपस्थितीत आणि नामदेव शास्त्रींच्या मार्गदर्शनाखालीच झाला. मात्र 2016 च्या मेळाव्याला विरोध करताना शास्त्रींनी 2014 च्या दाखल गुन्ह्याचा विषय काढला. त्यांना 2015 चा मेळावा घेत असताना 2014 च्या गुन्ह्याचा विसर पडला होता ! किती आश्‍चर्यकारक आहे ? पण राजकारणात सर्व काही शक्‍य असते, त्याप्रमाणेच इथेही घडते आहे. 

पंकजा या राज्य शासनात महत्त्वाच्या मंत्री आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भाजप सरकार आणण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे. तरी भगवानगडच्या विषयात शासकीय यंत्रणांकडून त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यांच्या मेळाव्याला आदल्या रात्रीपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे पंकजांचा प्रभाव रोखण्यासाठी भाजपमधून काही घटक प्रयत्न करत असल्याची चर्चा जोरावर होती. पंकजांबरोबरच नामदेव शास्त्री हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र भाजपला वाटते, त्यामुळे शास्त्रींना दुखावण्याची हिंमत भाजपमध्ये नाही. भगवानगड परिसरातील पाथर्डीच्या राजकारणात याची झलक झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांवेळी पहायला मिळाली. पंकजांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या एका गटाची संयुक्‍त शक्‍ती शास्त्रींच्या पाठीमागे कार्यरत असल्याचे, पंकजा समर्थकांचे म्हणणे आहे. 

पंकजा या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख कॅम्पेनर होत्या. त्यांच्या एवढ्या मोठ्या सभा राज्य पातळीवरील कोणत्याच नेत्याच्या झाल्या नव्हत्या. मुख्यमंत्रीपदाच्या त्या दावेदार होत्या. प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. मात्र या सत्तास्पधेतून पंकजा यांना रोखण्याची रणनिती पुढे आली. भगवानगडचा दसरा मेळावा, हे तर पंकजांचे शक्‍तीस्थान. त्यामुळे हा मेळावा नाही झाला तर पंकजांची ताकद आपोआप घटणार, असे गणित होते. मात्र 2016 ला ही रणनिती फेल ठरली. पंकजांनी पायथ्याला घेतलेल्या मेळाव्याला विक्रमी गर्दी लोटली. पंकजांनी जनाधार सिद्ध केला, मात्र त्यांना स्वत: च्या मतदारसंघात मतांच्या राजकारणात यश मिळवता आले नाही. सद्या त्या बॅकफूटवर आहेत. सर्व बाजूंनी त्यांची कोंडी झालेली आहे. त्यामुळे त्या आता किती गर्दी जमवू शकतात, हे पाहिले जाणारच. गर्दी कमी झाली तर पंकजांचा प्रभाव ओसरतोय, असा अर्थ काढला जाणार, हे स्पष्ट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दसऱ्या दिवशी धनंजय मुंडेही हेही शक्‍तीप्रदर्शन करण्याची शक्‍यता आहे. तेही गडावर येणार असल्याच्या बातम्या आहेत. पंकजा, शास्त्री आणि धनंजय अशी तीन शक्‍तीकेंद्रे दसऱ्याला भगवानगडावर दिसणार आहेत. त्यातील दोन स्पष्टपणे पंकजांच्या विरोधात असणार आहेत. यासंदर्भाने मेळाव्याचे विश्‍लेषण होईल. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा, ही पंकजांची अग्नीपरीक्षा असणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com