bhagwangad melawa palce issue | Sarkarnama

दसरा मेळावा कुठे ? पंकजाताई सांगतिल तिथे! 

मुरलीधर कराळे 
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मेळाव्यासाठी आम्ही आग्रही : गर्जे 
तहसीलदारांनी गडावर मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली असली, तरी भाजपचे कार्यकर्ते व अनेक भक्तगण मेळाव्यासाठी आग्रही आहोत. याबाबत सायंकाळपर्यंत मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत, असे पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्यूंजय गर्जे यांनी "सरकारना'माशी बोलताना सांगितले. 

नगर : भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत प्रशासनाने आज परवानगी नाकारली. त्यामुळे मेळावा गडाच्या पायथ्याला घ्यायचा की कुठे, याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे सांगतील, तसा निर्णय घेऊ, असा पवित्रा आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

गडावर केवळ वीस मिनिटे मेळावा घेऊ द्यावा, अशी विनंती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांना केली होती. तथापि, "पंकजाने यावे, जेवण करावे, पण भाषण करू नये,' अशा शब्दांत महंतांनी आलेल्या नेत्यांना सांगितले होते. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल तहसीलदारांना मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, असे निवेदन दिले. काल ग्रामपंचायत निवडणुकीची गडबड असल्याने याबाबत उद्या बोलू, असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितल्याने परवानगीबाबतचा विषय आज सकाळपासून पुन्हा सुरू झाला. 

आज सकाळीच पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्यूंजय गर्जे, उपाध्यक्ष बजरंग घोडके तसेच भाजपच्या अनेक कार्यकत्यांनी तहसीलदार व प्रांत कार्यालय गाठले. आज कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मेळाव्याच्या परवानगीबाबत सांगा, असा आग्रह त्यांनी धरला. दुपारी तहसीलदार पाटील व प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल हे नगरला जिल्ह्याधिकाऱ्यांशी बैठकिसाठी गेले. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी याबाबतचा निर्णय प्रांताधिकारी व तहसीलदारांवरच सोपविला. फक्त तांत्रिक बाबी पाहून घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. पाटील व बांदल हे पुन्हा पाथर्डीला येऊन तांत्रिक बाबींची पूर्तता नसल्याने या मेळाव्याला परवानगी देता येणार नसल्याचे लेखी दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पुन्हा तेथे बैठक झाली. मेळावा गडाच्या पायथ्याला घ्यावा की कसे, याबाबत पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. त्यामुळे लवकरच मुंडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मेळाव्याचे भवितव्य ठरणार आहे. 

तांत्रिक अपूर्तता असल्याने परवानगी नाकारली : बांदल
भगवान गडावर मेळावा घेण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आदींच्या ना हारकत प्रमाणपत्रांची गरज असते. ही पत्रे अर्जासोबत नव्हती. तसेच देवस्थान ट्रस्टने या मेळाव्याला परवानगी देऊ नये, असे लेखी दिल्याने तांत्रिक बाबी अपूर्ण होत्या. त्यामुळे ही परवानगी नाकारली, असे पाथर्डीचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

संबंधित लेख