bhagwan gad | Sarkarnama

दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर भगवान गडाला पोलीस अधीक्षकांची भेट

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 सप्टेंबर 2017

. दसरा मेळावा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शर्मा जिल्ह्यात हजर झाल्यानंतर प्रथमच भगवान गडावर गेले होते. या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने महंतांशी त्यांनी चर्चा केली, असे असले तरी बंद खोलीत चर्चा कशासाठी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. 

नगर : दसरा मेळाव्याच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी भगवान गडाला भेट देऊन गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांच्याशी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. ही चर्चा नेमका कोणत्या विषयावर झाली, याची माहिती मिळाली नसली, तरी आगामी काळात होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गडाच्या सुरक्षेसाठी ही चर्चा असावी, असा अंदाज कार्यकर्त्यांनी बांधला. 

गडावर राजकीय भाषण होणार नाही, या भुमिकेवर महंत ठाम राहिल्याने भगवान गडावरील दसरा मेळावा मागील वर्षी गडाच्या पायथ्याला झाला. त्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप महाराज असा वाद सुरू झाला. मेळावा गडावरच होणार, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली होती. नंतर मात्र वाद वाढू नये म्हणून मुंडे यांनी नमते घेत दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला घेतला. या वर्षी मात्र मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा गडाच्या पायथ्यालाच घ्यायचा, असे आधीच जाहीर करून टाकले. त्यामुळे हा वाद राहणार नाही, असी भूमिका जाहीर झाली. असे असले, तरी मुंडे यांचे कार्यकर्ते मात्र महंतांवर नाराज राहिले. त्याचे पडसाद या वर्षीही उमटू शकतात. मेळावा जरी गडाच्या पायथ्याला झाला, तरी गडावर पुरेसे संरक्षण ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा, ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी भगवान गडावर जाऊन गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दसरा मेळावा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शर्मा जिल्ह्यात हजर झाल्यानंतर प्रथमच भगवान गडावर गेले होते. या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने महंतांशी त्यांनी चर्चा केली, असे असले तरी बंद खोलीत चर्चा कशासाठी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. 

समेट नाही आणि मनेही जुळली नाहीत 
भगवान गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज व ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्यात समेट घडावा, यासाठी पाथर्डी तालुक्‍यातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मात्र पंकजा मुंडे यांना दिलेले आव्हान म्हणजे कै. गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराला आव्हान असल्याचे मानणारे काही लोक आहेत. त्यामुळे महाराजांविषयीची चीड संबंधितांमध्ये आहे. त्यामुळे दोघांमध्ये समेट झाला नाही. जाहीर वक्तव्य करताना दोघेही आमच्यात वाद नसल्याचे सांगत असले, तरी मने जुळली नाहीत, हे मात्र खरे. मागील वर्षी पोलिस बंदोबस्त मोठा होता. या पार्श्वभूमीवर या वर्षीही गडाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. 

संबंधित लेख