'Bhagoda' and 'Pacoda' schemes are famous in the country, says Kanhaiya Kumar | Sarkarnama

देशात `भगोडा' व `पकोडा' योजना फेमस; युवा नेते कन्हैय्या कुमारांची टीका

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 23 डिसेंबर 2018

जनधन योजनेतून जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदींच्या हाती देऊन देशातून पळून जाण्यास मदत केली. दुसरीकडे उच्चशिक्षित युवकांना नरेंद्र मोदी पकोडे विकायला लावत आहेत. देशात भगोडा आणि पकोडा या दोनच योजना फेमस आहेत, अशी घणाघाती टीका युवा नेते कन्हैय्याकुमार यांनी केंद्र सरकारवर केली.

नागपूर : जनधन योजनेतून जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदींच्या हाती देऊन देशातून पळून जाण्यास मदत केली. दुसरीकडे उच्चशिक्षित युवकांना नरेंद्र मोदी पकोडे विकायला लावत आहेत. देशात भगोडा आणि पकोडा या दोनच योजना फेमस आहेत, अशी घणाघाती टीका युवा नेते कन्हैय्याकुमार यांनी केंद्र सरकारवर केली.
 
बहुजन विचारमंचतर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित "संविधान जागर'मध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर अध्यक्षस्थानी होते. आमदार जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे केंद्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री नितीन राऊत, माजी महापौर अटलबहादूर सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. 

कन्हैय्याकुमारने खास शैलीत थेट मोदी-शहांवर हल्ला चढविला. पैसे देऊन वोट खरेदी करतात, नंतर हजारो कोटी घेऊन नीरव मोदी पळून जातो. राजकारणाचा हा गेम सेट आहे. जनतासुद्धा मूकदर्शक बनून बघते आहे. देशात आता पक्षा-पक्षांची लढाई नाही. मोदीविरुद्ध आम्ही भारतीय अशी ही लढाई आहे. उद्योगपतींसाठी सरकारने लाखो कोटींची मागणी आरबीआयकडे केली. यामुळेच आरबीआय प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला. नोटबंदीतून तीन लाख कोटी रुपये पुढे आल्याचा दावा मोदी करतात, मग मेट्रोसह अन्य योजनांसाठी विदेशातून पैसा का आणावा लागतो, असा प्रश्‍न त्याने उपस्थित केला. 

"स्किल इंडीया' या योजनेतील "एस' सायलेंट असून ही खऱ्या अर्थाने किल योजना असल्याचा आरोप कन्हय्या कुमार यांनी केला. मोदींचा बनाव आता लोकांना कळला आहे, म्हणूनच "मोदी अच्छे आदमी है', असा उल्लेख करताच हास्यकल्लोळ होतो, अशी कोटीसुद्धा त्याने केली. 

नितीन राऊत यांनी संविधान धोक्‍यात असल्याचे सांगितले. पंतप्रधानांना संसद चालवायचीच नाही त्यांना बाहेरच अध्यादेश काढून कारभार चालवायचा असल्याचा आरोप त्यांनी केला. यशवंत मनोहर यांनी भारतातील अंतीम लढाई धर्म विरुद्ध संविधान अशीच होणार असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रफुल्ल गुडधे यांनी केले. संचालन अनमोल शेंडे यांनी केले. माजीमंत्री शिवाजीराव मोघे, अनिस अहमद, आमदार सुनील केदार, आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
 

संबंधित लेख