कराडांच्या अध्यक्षपदामुळे भाजपमधील लोकसभा, विधानसभा इच्छुकांच्या आनंदाला उधाण

 कराडांच्या अध्यक्षपदामुळे भाजपमधील लोकसभा, विधानसभा इच्छुकांच्या आनंदाला उधाण

औरंगाबाद : मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी महापौर व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची गुरुवारी शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. गेल्या पाच वर्षापासून रिक्त असलेल्या या पदावर नेमणूक झाल्याने मराठवाड्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. कराड यांच्या नियुक्‍तीचा सर्वाधिक आनंद आगामी लोकसभा, विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या भाजपमधील इच्छुकांना झाल्याची जोरदार चर्चा आहे. 

मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. भागवत कराड यांची निवड झाल्यानंतर त्यांचे आज (ता. 22) शहरात आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छूक आहे असे जाहीरपणे सांगणाऱ्या डॉ. कराड यांची वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. यापैकी एक म्हणजे हे पद देवून पक्षाने त्यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा पत्ता कट केला आहे. 

स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याचे निकटवर्तीय म्हणूून भागवत कराड ओळखले जातात. पक्षाने त्यांना नगरसेवक, उपमहापौर, महापौर, विधानसभेची उमेदवारी आणि आता प्रदेश उपाध्यक्ष पद दिले आहे. भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक आणि पंकजा मुंडे यांचा पाठिंबा या जोरावर डॉ. कराड यांनी पक्षात आपले स्थान पक्के केले आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण कॉंग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पंधरा हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला आणि त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले. 2014 मध्ये ते पूर्वमधून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छूक असतांना पक्षाने अतुल सावे यांना संधी दिली आणि मोदी लाटेमुळे सावे यांना यश मिळाले. 

आता लोकसभेची आस 
आमदार होण्याची संधी हुकली तरी डॉ. कराड यांनी अद्याप आशा सोडलेले नाही हे त्यांच्या वेळोवेळीच्या भूमिकांवरून स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर भाजपने देखील एकला चलोची तयारी सुरू केली होती. उत्तर प्रदेशातील मंत्री डॉ. महेंद्र सिंग यांनी शहरात बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणीही केली. 

वीस वर्षापासून लोकसभेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्यामुळे लोकसभा लढवण्यास भाजपकडून फारसे कोणी इच्छूक दिसत नसतांना डॉ. भागवत कराड यांनी तयारी दर्शवली. पक्षाच्या विविध कार्यक्रम, पत्रकार परिषदांमधून देखील त्यांनी जाहीरपणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली तर पूर्व किंवा फुलंब्री मतदारसंघातू विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी देखील डॉ. कराड प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. 

ही चर्चा सुरू असतांनाच त्यांची मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांना आपला मार्ग मोकळा झाला अशे वाटले तर नवल नाही. महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यामुळे आता डॉ. कराड यांचा लोकसभा, विधानसभा उमेदवारीचा दावा संपला अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने त्यांची बोळवण केल्याचेही बोलले जाते. 

मात्र आता लोकसभा लढवण्यासाठी जास्त बळ मिळाले असल्याची भावना डॉ. भागवत कराड यांनी सरकारनामा प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारकडून निधी मंजुर करून घेणार आणि त्या जोरावर ताकदीने लोकसभा निवडणूकीत आपण उतरू असे सांगत त्यांनी आपण अजूनही उमेदवारीवरील दावा सोडलेला नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे डॉ. कराड यांचा पत्ता कट झाला या आनंदात असणाऱ्या भाजपमधील इतर इच्छुकांची घालमेल अजूनच वाढणार एवढे मात्र निश्‍चित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com