between ncp and manase something is cooking | Sarkarnama

मनसे आणि राष्ट्रवादीत काहीतरी घडतयं...शिजतयं!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

राजकारणात काहीही घडू शकते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तसे संकेत सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि मनसे हे दोन्ही पक्ष देत आहेत. एकमेकांवरील टीका या दोन्ही पक्षाचे नेते टाळत असून, उलट एकमेकांचे कौतुक ते करत आहेत. या कौतुकामागे नक्की दडलयं काय?

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांत नक्की काहीतरी घडत असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे या दोघांच्या अधुनमधुन भेटी होत आहेत. राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते मनसेच्या व्यासपीठावर जात आहेत.

हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ आले असले तरी ते राजकीयदृष्ट्या युती किंवा आघाडी करतील का, याबाबत सध्या काही बोलले जात नाही. मात्र भविष्यात आणि राजकारणात काहीही घडू शकते, हे देखील पक्षाचे नेते नाकारत नाहीत. या एकत्र येण्याची सुरवात ही पुण्यात झाली. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची पुण्यात मुलाखत घेतली. ही मुलाखत देशभर गाजली. पवार यांनीही राज यांचे कौतुक केले. या मुलाखतीला जमलेल्या तरुणांच्या प्रचंड गर्दीवरून त्यांनी राज यांच्या क्रेझबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीच थाप टाकली होती. तसेच राज यांनीही पवार हे महाराष्ट्राचे जाणते नेते सांगत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला होता.

त्यानंतर थेट गेल्या आठवड्यात पवार यांनी राज यांची पुन्हा भेट घेतली होती. या भेटीचे अधिकृत कारण हे इव्हीएम मशीनचा निवडणुकीतील वापर बंद करण्याची मागणी हे सांगण्यात आले होते. त्यानंतर या दोघांतील परस्पर आदर काल पुन्हा दिसून आला. राज ठाकरे आणि शरद पवार हे एकाच दिवशी धुळे जिल्ह्यात होते. धुळ्यात राज यांची सभा झाली. या सभेत बोलताना राज यांनी थेट राष्ट्रवादीचे कौतुक केले. राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड या शहरात आणि मनसेने नाशिकमध्ये चांगले काम करूनही पालिका निवडणुकीत येथील मतदारांनी दोन्ही पक्षांनानाकारल्याबद्दल राज यांनी नाराजी व्यक्त केली. राज यांनी थेट राष्ट्रवादीने चांगले काम केल्याचे प्रमाणपत्र दिल्याने तो देखील वेगळाच मु्द्दा ठरला.

हे कौतुक होते ने होते तोच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात आज मनसेच्या दहीहंडीच्या व्यासपीठावर हजेरी लावली. मनसेचे ठाणेप्रमुख अविनाश जाधव यांच्या दहीहंडीस आव्हाड हे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात यातून थेट काही निष्कर्ष निघत नसला तरी भविष्यातील संकेत मात्र दिसत आहेत.

या आधी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अजित पवार आणि राज ठाकरे या दोघांमध्ये जुगलबंदी उडाली होती. राज यांनी जलसंपदा विभागातील निधी कोठे गेला, असा सवाल थेट अजितदादांसमोरच विचारला होता. त्यानंतर राज यांची बोलघेवडे अशी संभावना अजितदादांनी केली. या प्रकारानंतर दोन दिवसांनी बोलताना राज यांनी अजितदादांनी माझे म्हणणे इतके गांभीर्याने का घेतले, असे म्हणत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ही चकमक वगळता दोन्ही पक्षांत कधी नव्हे इतके मधुर संबंध दिसून येत आहेत.

राज यांच्या करिश्म्याचा आणि राष्ट्रवादीच्या नेटवर्कचा फायदा परस्परांना होऊ शकतो. आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्ष हे चांगली कामगिरी करून दाखवणार आहेत, हे शरद पवार वारंवार वेगवेगळ्या मुलाखतीत मांडत आहेत. महाराष्ट्रात मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन प्रादेशिक पक्ष आहेत. आता पवार हे त्यांच्या राजकीय कौशल्यानुसार कोणत्या ठाकरेंना बरोबर घेणार, याची चर्चा तरी या निमित्ताने सुरू झाली आहे.  
 

संबंधित लेख