सीईओ अमोल येडगेंची धडाकेबाज एंट्री; अगोदर कारवाई मग चढले झेडपीची पायरी

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, विकास कामे करण्यावर आपला भर असले. प्रशासन गतिमान करण्यास देखील आपले प्राधान्य राहील असे स्पष्ट करतांनाच कामचुकार अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गय न करता त्यांच्यावर कारवाई होणारच - अमोल येडगे
सीईओ अमोल येडगेंची धडाकेबाज एंट्री; अगोदर कारवाई मग चढले झेडपीची पायरी

बीड :बीड ज़िल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) अमोल येडगेंची  एंट्री धडाकेबाजझाली आहे . अगोदर कारवाई मग चढली झेडपीची पायरी असा नवा फंडा त्यांनी घालून दिला आहे . 


 अमोल येडगे यांची यापुर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांना रुजू होता आले नाही. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता बीडला पोचताच त्यांनी जिल्हा परिषदेत फेरफटका मारत कार्यालय नजरेखालून घातले.

सकाळी पदभाराची औपचारिकता संपताच त्यांनी जिल्हा परिषदेत न जाता थेट दोन तालुक्‍यांचा दौरा केला . दोन पंचायत समित्यांतील  पंधरा गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली. कामचुकारपणा करणाऱ्यांची खैर नाही असा संदेशच त्यांनी यातून दिला. त्यानंतरच येडगे जिल्हा परिषदेची पायरी चढले.

बीड जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे आंधळ दळतय,अन कुत्र पिठ खातयं असाच असल्याची टिका नेहमी केली जाते. शिपायाला थेट शिक्षक म्हणून नेमणूक, अंतरजिल्हा बदलीत कुठेच नोकरीला नसणाऱ्यांची शिक्षक म्हणून बदलीने नियुक्ती, मयत शासकीय नोकरदारांची मग्रारोहयोत नावे असणे असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत . 

शिक्षकांच्या बेकायदेशीर आंतरजिल्हा बदल्या, शिक्षकांच्या वेतन देयकातील अनियमितता, बांधकाम- लघुपाटंबधारे विभागातील घोटाळे, समाजकल्याण विभागातील अनियमितता अशी जिल्हा परिषदेतील कारनाम्यांची मोठी यादी आहे.याशिवाय वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा आधीच मलीन झालेली आहे.

 पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळून कारभार हाकण्याची अधिकारी, कर्मचाऱ्यांना सवय जडल्यामुळे कारवाई होण्याचा प्रश्‍नच कधी उद्भवला नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेला यापूर्वी 2010-11 मध्ये नितीन खाडे हे आयएएस दर्जाचे मुख्य कार्यकारीअधिकारी होते. त्यानंतरचे राजाराम माने, राजीव जवळेकर व नामदेव ननावरे हे महाराष्ट्र विकास सेवा दर्जाचे होते. तर, नऊ महिन्यांपासून जिल्हा परिषदेचा कारभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला हे हाकत आहेत.

यापूर्वी राजाराम माने यांनी कर्मचाऱ्यांवरील कारवायांबरोबरच लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या कामांना लगाम घालत खमकेपणाची चुणूक दाखविली होती. दरम्यान, सात वर्षानंतर आयएएस दर्जाचे व तरुण अधिकारी येत असल्याने बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.

कळमनुरी व नाशिक येथे दिड वर्षे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि नाशिकच्या नऊ महिन्याच्या काळातील आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक या पदांच्या कामाचा अनुभव पाठीशी असलेले अमोल येडगे यांची शुक्रवारी बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली.

बुधवारी ते रूजू होणार असल्याने त्यांच्या आगमनाची सर्वांनाच उत्सूकता होती. मध्यरात्री बीडमध्ये पोचताच त्यांनी अडीच वाजता जिल्हा परिषद आवारात जाऊन कार्यालय नजरेखालून घातले. यानंतर सकाळी विश्रामगृहावर पदभार स्विकारण्याची औपचारिकता पुर्ण केली. त्यानंतर ते कार्यालयात जाऊन पदभार घेतली अशीच सगळ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे कधीतरी कार्यालकडे फिरकणारे अधिकारी, कर्मचारी वेळेपुर्वीच हजर झाले होते.

 गाडी थेट तालुक्‍याकडे 

पण येडगेंनी गाडी जिल्हा परिषद कार्यालयाकडे न घेता थेट शिरुर कासारकडे नेण्याची सुचना चालकाला केली. रस्त्यावरीलच नवगन राजूरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करुन आरोग्य सेवे संदर्भात रुग्णांशी चर्चा करून माहिती घेतली.

त्यानंतर शिरुर पंचायत समितीला भेट दिली तेव्हा गटविकास अधिकारी सोनवणे यांच्यासह नऊ कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांना आढळले. पुढे याच तालुक्‍यातील खोकरमोह शाळा, पाटोदा तालुक्‍यातील पाटोदा ग्रामपंचायत आणि शाळांना येडगे यांनी भेटी दिल्या.

अडीच तासांचा दौरा आणि प्रत्यक्ष भेटीत त्यांना एकूण 15 अधिकारी-कर्मचारी दांडीयात्रेवर असल्याचे आढळून आले. या सर्वांना नोटीसा बजावण्याच्या सुचना अमोल येडगेंनी तात्काळ विभागप्रमुखांना दिल्या.

पदभार घेतल्यानंतर विभागप्रमुखांच्या बैठका, सुचनांचा मारा, पाहणी दौरा असा क्रम सहसा ठरलेला असतो.

अमोल येडगेंनी मात्र ही प्रथा मोडीत काढीत नवा पायंडा पाडला. कामचूकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांनी आपल्या कामाची पध्दत कशी असेल याचा ट्रेलर दाखवून दिला. त्यानंतरच जिल्हा परिषदेतील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. येडगे यांच्या या धडाकेबाज एन्ट्रींने सर्वसामान्यांमध्ये उत्साह तर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरल्याची चर्चा दिवसभर होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com