Beed politics agriculture deelip gore | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राजकारणातील अपयश शेतीतील कर्तृत्वाने धुवून काढले

दत्ता देशमुख
शनिवार, 22 जुलै 2017

त्यांनी तीन एकरांत उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड केली. त्यांची टोमॅटोची तोडणी सुरु झाली आणि बाजारात चांगला भाव सुरु झाला. दोन दिवसांत त्यांनी शेतातून 150 कॅरेट टोमॅटो तोडले आहेत. त्यातून त्यांना साधारण सात हजार रुपये क्‍लिंटल प्रमाणे भाव मिळून दोन लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. टोमॅटोची झाडे फळांनी लगडलेली असल्याने शेवटपर्यंत यातून पाच हजार कॅरेट पर्यंत माल निघेल व भाव घसरले तरी 50 लाखांहून अधिक उत्पन्न निघेल. या टोमॅटोला त्यांना केवळ चार लाख रुपयांचा खर्च आला आहे.

बीड : एकदा माणूस पूर्णवेळ राजकारणात गेला तर तो काही परत आपल्या मूळ व्यवसायाकडे परतत नाही. यश मिळो की अपयश तो राजकारणाच्याच चक्रात फिरत रहातो. शेती म्हणजे सर्वात अवघड धंदा. शेतीकडे तर कोणी परत येतच नाही.

पण बीडचे नगराध्यक्ष राहिलेले दिलीप गोरे मात्र याला अपवाद आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता ते पुन्हा उत्साहाने आपल्या वडिलोपार्जित शेती उद्योगाला लागले आणि नशीबानेही त्यांना शेतीत अगदी भरभरून दिले. 

राजकीय कारकिर्दीचा वारा लागला कि पुन्हा व्यवसाय वा शेती नको वाटते. पण, दिलीप गोरेंनी मागच्या वर्षभरापासून शेतीकडे पुर्णवेळ लक्ष केंद्रीत करुन शेती व्यवसाय उत्तम असल्याचे दाखवून दिले आहे. सलग आठ वेळा विविध निवडणुका जिंकणाऱ्या गोरेंच्या पदरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पडला. पण, हाच पराजय त्यांना शेती विकासाला चालना देणारा ठरला. 

त्यांनी आपल्या शेतातील तीन एकरांवर सात कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. सध्या त्यांच्याकडे तीन एकरांवरील टोमॅटो पीक बहरात असून दोन दिवसांच्या तोडणीतच पावणे तीन लाख रुपयांचे उत्पन्न निघले आहे. शेवट पर्यंत 50 लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. परिसरातील उमरद पारगाव येथे दिलीप गोरे यांची वडिलोपार्जीत 75 एकर शेती आहे. त्यांचे दोघे भाऊ पारंपारिक शेती करत. 

स्वत: श्री. गोरे शिक्षणासाठी बीडमध्ये आल्यानंतर राजकीय प्रवाहात ओढले गेले. महाविद्यालयाचे सीआर, युआर, शिवसेना प्रणित विद्यार्थी सेना, युवक कॉंग्रसचे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस तसेच शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा संघटनात्मक प्रवास राहीला.

तर बीडचे नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राहीलेले श्री. गोरे बाजार समितीचे संचालकही राहीले. संघटनात्मक आणि राजकीय प्रवासात त्यांनी कधीतरीच शेतीच्या बांधावर चक्कर मारली. कारण, कुठल्याही निवडणुक फडात उतरणाऱ्या गोरेंना गुलालच लागे. पण, मागच्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसंग्रामकडून रिंगणात उतरलेल्या गोरेंना पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे त्यांनी थेट शेतीचा रस्ता धरला. पण, हा पराभव त्यांना शेतीतील उन्नतीचा मार्ग ठरला आहे. 

त्यांनी शेतात भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे. राजकीय योग असणाऱ्या गोरेंना शेतीबाबतीतही योग आला आहे. टोमॅटोचे दर शंभरावर गेले आहेत. यातच त्यांनी तीन एकर टोमॅटो शेती फळांनी बहरली असून सध्या टोमॅटोला बाजारात भावही चांगला आहे. दोन दिवसांच्या तोडणीतच दोन लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. शेवटपर्यंत 50 लाख रुपयांचे उत्पन्न शक्‍य असल्याचा अंदाज आहे. राजकीय फडात पुढे असलेल्या गोरेंनी शेतीतही मागे नसल्याचे दाखवले आहे. 

तीन एकरांवर शेततळे अन्‌ टोमॅटोची साथ 
श्री. गोरे यांच्या शेतात पाच विहिरी असल्या तरी पर्जन्यमानामुळे पाणी टिकण्याची शक्‍यता कमी असते. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांनी तीन एकर क्षेत्रावर शेततळे उभारले आहे. सात कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात विहिरींसह ते परिसरातील सिंदफणा बंधाऱ्याहून आणलेल्या सहा किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी साठवले आहे.

त्यावर त्यांनी तीन एकरांत उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड केली. त्यांची टोमॅटोची तोडणी सुरु झाली आणि बाजारात चांगला भाव सुरु झाला. दोन दिवसांत त्यांनी शेतातून 150 कॅरेट टोमॅटो तोडले आहेत. त्यातून त्यांना साधारण सात हजार रुपये क्‍लिंटल प्रमाणे भाव मिळून दोन लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. टोमॅटोची झाडे फळांनी लगडलेली असल्याने शेवटपर्यंत यातून पाच हजार कॅरेट पर्यंत माल निघेल व भाव घसरले तरी 50 लाखांहून अधिक उत्पन्न निघेल. या टोमॅटोला त्यांना केवळ चार लाख रुपयांचा खर्च आला आहे.

त्यांनी यासह 10 एकर खरबुजातून नुकतेच 17 लाख रुपयांचे उत्पन्न घतले. त्यासाठी सात लाखांचा खर्च आला. यासह त्यांनी सध्या तीन एकरांत हळद व आल्याची लागवड केली असून 15 एकरांत विविध वाणांचा ऊस लावला आहे. केळी, मोसंबी व पपईची प्रत्येकी आठ एकरांवर लागवड करण्याची पुर्ण तयारी झाली आहे. 

संबंधित लेख