विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर यांची शिवजयंतीतून विधानसभेची मोर्चेबांधणी

Pandit---khsirsagar
Pandit---khsirsagar

बीड : विजयसिंह पंडित व संदीप क्षीरसागर या जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या माध्यमातून दोघांनीही आगामी विधानसभेची जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. आपापल्या भागात युवकांमध्ये क्रेझ असलेले हे दोन्ही तरूण तडफदार नेते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. 

निवडणुकांचे गणित जुळवायचे तर गर्दीचे इव्हेंट महत्वाचे समजले जातात. यंदाच्या शिवजयंती मिरवणूकीत गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघाले. अठरा पगड जातींची लोक या मिरवणूकीत सहभागी झाले होते. तरुण आणि महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. शिवाजी महाराजांबद्दल असलेली निस्सीम श्रद्धा लक्षात घेऊन यंदा जिल्ह्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित व संदीप क्षीरसागर या दोन युवा नेत्यांनी शिवजयंतीचे भव्य महोत्सव साजरे केले. 

विजयसिंह पंडित यांनी गेवराईत तीन दिवस राजा शिवछत्रपती या महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन करत गेवराईकरांना त्यांचा मोफत लाभ घडवला. डोळ्याचे पारणे फेडणारे या महानाट्याचे तीन प्रयोग झाले. गेवराईच्या र. भ. अट्टल महाविद्यालयात उभारण्यात आलेला किल्याचा भव्य देखावा, दोनशेवर कलावंतांचा संच, हत्ती, घोडे, उंट यामुळे जणू शिवकालीन काळच पुन्हा जिवंत झाल्याची अनुभूती महानाट्य पाहणाऱ्या प्रेक्षकांनी घेतली. 

या महानाट्याची तयारी आणि आयोजनासाठी विजयसिंह पंडित आणि त्यांचे मावळे महिनाभर झटत होते. महानाट्याला झालेल्या तुफान गर्दीने या सगळ्यांच्या मेहनतीचे चीज झाल्याचे बोलले जाते. त्यांनतर शिवजयंती मिरवणूकीत देखील विजयसिंह पंडित स्वत: शिवरायांचा जयघोष करत ढोल वाजत होते. एकूणच मागील वर्षभरापासून त्यांनी सुरु केलेल्या आगामी विधानसभेच्या तयारीत जयंती सोहळा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. 

संदीप क्षीरसागरांचेही शक्ती प्रदर्शन 

बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनीही सार्वजनिक शिवजयंतीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विचारवंतांची व्याख्याने आणि सहा तासांच्या भव्य मिरवणुकीतील त्यांचा वावर लक्षवेधी होता. आपल्या नेतृत्वाखाली बीडकरांची गर्दी जमवून त्यांनी विरोधकांना विचार करायला भाग लावल्याची चर्चा या निमित्ताने होती. मिरवणुकीत कोल्हापूरचे ढोल पथक, गोवा येथील कला संच, चारशे कलावंतांचे झांज पथक, भव्य शिवरथ, ओडिशातील कलाकारांच्या चित्तथरारक कसरतीमुळे शिवजयंती मिरवणूक अविस्मरणीय ठरली. 

महिनाभराच्या परिश्रमानंतर जल्लोषात साजऱ्या झालेल्या शिवजयंती व त्यासाठी झालेली गर्दी पाहून संदीप क्षीरसागर व त्यांच्या समर्थकांचा आनंद द्विगुणीत झाला. सात तासांच्या मिरवणुकीत संदीप क्षीरसागर हातात भगवा घेऊन शिवरायांचा जयघोष करत होते. विजयसिंह पंडित व संदीप क्षीरसागर हे दोघेही विधानसभेची तयारी करत असल्याने या महोत्सवाच्या माध्यमातून युवकांची जमलेली गर्दी त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com