बीडमध्ये राष्ट्रवादीच्या संस्थेत 110 किलो म्हणजे एक क्विंटल; भाजपविरुद्ध आता कसे रान पेटविणार

शासनाच्या कडधान्य हमीभाव खरेदिसाठी नाफेड मार्फत केज तालुक्यात खरेदी विक्री संघाची नेमणूक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या आशिपत्याखालील संस्थेने शेतकऱ्यांकडून प्रत्येक क्विंटलमागे दहा किलो हरभरा अधिक घेऊन लूट केल्याचा आरोप आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या संस्थेत 110 किलो म्हणजे एक क्विंटल; भाजपविरुद्ध आता कसे रान पेटविणार

बीड : गेल्या वर्षीचे रखडलेले बोंडअळी अनुदान, शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया पीकविमा आणि हमीभाव खरेदीत शेतकऱ्यांची झालेली फरफट यावरून सरकार विरोधात टीकेची झोड उठत आहे. मात्र, सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असले तरी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील संस्थाच शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. 110 किलो म्हणजे एक क्विंटल असे मापाचे नवे सूत्र लावून शेतकऱ्यांना नागविलेल्या केज खरेदी विक्री संस्थेची सहकार विभागाने खरेदी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या अधिपत्याखालील संस्थेच्या या प्रतापमुळे राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील नेत्यांचा सरकार विरोधातला आवाज ऐन अधिवेशनात कंठातच दाटणार आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, स्थानिक नेतृवाबाबत अविश्वास आणि नेत्यांची गटबाजी या कारणांनी  राष्ट्रवादीचा सरकार विरोधी आवाज फारसा उचलला जात नाही. एखादं दुसरा नेता तालुक्याला आंदोलन करतो. किंवा कोणाचे फोटोपुरते तर कोणाचे सोशल मीडिया पुरते आंदोलन असते. त्यामुळे आंदोलनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलने पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप होतो. दरम्यान, मागच्या वर्षात हमीभाव खरेदीसाठी सरकारने ऑनलाइन निंदणी सक्तीची केल्याने शेतकरी संभ्रमात अडकला. त्यात वारंवार बारदान्याचा तुटवडा आणि खरेदी केलेला माल साठविण्यास जागा नसल्याने खरेदी वारंवार बंद राहिली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आपला शेतमाल हमी भावाने विकता आला नाही. 

शेतकऱ्यांची ही फरफट कमी की काय म्हणून खरेदी केलेल्या शेतमालाचे 150 कोटी रुपयांहुन अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळालीच नाही. याची ओरड होत असतानाच सरकारने 14 शेती वाणांचे हमीभाव दीडपट वाढविल्याची घोषणा केली. मात्र, यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. इथे मालाची खरेदी होत नाही आणि खरेदी केलेल्या मालाचे पैसे सरकार देत नाही असा आरोप विरोधी पक्षांनी केला. ऐतिहासिक भाववाढीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. एकीकडे सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असताना दुसरीकडे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील संस्थाच शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे समोर येत आहे.

हमीभावाने हरभरा खरेदी करताना केजच्या खरेदी - विक्री संघाने क्विंटल मागे 10 किलो जास्त घेतल्याच्या तक्रारीची चौकशी सुरू झाली आहे. खरेदी काळात सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पिळविला जात असताना राष्ट्रवादीच्या संस्था शेतकऱ्यांना नागवित होत्या. म्हणूनच या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अपवाद वगळता राष्ट्रवादीचे नेते गप्पच होते असा आरोप आता होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या अधिपत्याखालील या खरेदी केंद्रावर 110 किलो म्हणजे एक क्विंटल असा नवा मापदंड शोधून शेतकऱ्यांची लूट केल्याच्या तक्रारींचा पाऊस जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात पडला आहे. त्याअनुषंगाने तालुका निबमधकांनी चौकशी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी अगोदर ऑनलाइन नोंदणी करूनही या ठिकाणी व्यापाऱ्यांची मापे अगोदर झाली. विशेष म्हणजे खरेदी विक्री संघ केजला असताना ही खरेदी आणि मापे केजपासून दूर असलेल्या सोनवणे यांच्या खासगी साखर कारखान्यावर आणि वजन काट्यावर झाली आहेत. 

यापूर्वी सोनवणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती असताना शिक्षक बदल्यांच्या 'भावाची' चर्चा होऊन पक्षाची पुरती इज्जत गेली होती. आता राष्ट्रवादीचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात सरकार विरोधात आवाज उंचावत असताना आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या संस्थेत शेतकऱ्यांची झालेली लूट चव्हाट्यावर आल्याने त्यांचा आवाज कंठात अडककण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com