beed-ncp-appointed-bajrang-sonwane-new-district-president | Sarkarnama

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा बजरंग सोनवणेंच्या हाती

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

वर्षभरापूर्वी बजरंग सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. पक्षात जयंत पाटलांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात दोन टप्प्यांत राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या  निवडीत बीडची निवड राहीलेली होती. 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची ईनिंग सुरु झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या. मात्र, बीडची निवड राहीली होती. मंगळवारी झालेल्या निवडीत बीडच्या जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांच्या हाती सोपविली आहे.
 
बजरंग सोनवणे यांची वर्षभरापूर्वी या पदावर निवड झाली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि तत्कालिन प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी त्यावेळी सोनवणेंच्या नावासाठी जोर लावला होता. यावेळी मात्र कोणत्याही बड्या नेत्यांची शिफारस नसताना पक्षाने पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांच्यावर विश्वास टाकला आहे. 

दुसऱ्यांदा पक्षाचे जिल्हाध्यक्ष होणारे बजरंग सोनवणे तिसऱ्या वेळी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी शिक्षण सभापती म्हणूनही काम केलेले आहे. येडेश्वरी या खासगी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी ऊसगाळपातही आघाडी घेतलेली आहे. त्यांच्या फेरनिवडीने त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे. 

जिल्हाध्यक्षपदाची गदा पुन्हा त्यांच्या हाती आली असली तरी मरगळ आलेल्या पक्षाची बांधणी बजरंग सोनवणे कशी करतात याकडे लक्ष लागले आहे. 

 
 

संबंधित लेख