beed ncp | Sarkarnama

बीडमध्ये राष्ट्रवादीत शह - काटशह आणि अविश्वासाचे वातावरण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

बीड : पक्षाचे काहीही झाले तरी आपली जागा पुढे अन सोबतच्यांच्या पायात पाय घालण्यासाठी नेत्यांकडूनच बळ देण्याचे राष्ट्रवादीतील प्रकार काही केल्या थांबत नाहीयेत. कुरघोडीच्या राजकारणातून नेत्यांचा एकमेकांवरील विश्‍वास उडत असून माजीमंत्री सुरेश धस यांच्याबद्दल सध्या असे वातावरण तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

बीड : पक्षाचे काहीही झाले तरी आपली जागा पुढे अन सोबतच्यांच्या पायात पाय घालण्यासाठी नेत्यांकडूनच बळ देण्याचे राष्ट्रवादीतील प्रकार काही केल्या थांबत नाहीयेत. कुरघोडीच्या राजकारणातून नेत्यांचा एकमेकांवरील विश्‍वास उडत असून माजीमंत्री सुरेश धस यांच्याबद्दल सध्या असे वातावरण तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

संदीप क्षीरसागर यांना जवळ करत अजित पवार यांनी आमदार जयदत्त क्षीरसागर यांना देखील झटका दिल्याचे बोलले जाते. या दोन्ही नेत्यांना जिल्हा परिषदेतल्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्यामुळे याला पुुष्टी देखील मिळते. बीडच्या राजकारणातून जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांना मागे सारत धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांनी जिल्ह्याची सूत्रे आपल्या हाती घेण्याचा दिशेने टाकलेले हे पाऊल समजले जात आहे. 
राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या 60 पैकी सर्वाधिक 26 जागा जिंकल्या. यामध्ये सर्वाधिक नऊ जागा जिंकल्याने प्रकाश सोळंके यांनी पत्नीसाठी अध्यक्षपदाची उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. दुसरीकडे माजीमंत्री सुरेश धस यांच्या पत्नी पराभूत झाल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले.

या निराशेतून ते सोळंके यांच्या पत्नीला विरोध करत असल्याचे, तर मंगला सोळंके यांना उमेदवारी आपल्यामुळेच मिळाल्याचे चित्र मुंडे-पंडित गटाने मोठ्या खुबीने रंगवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
पुतण्याचा काकांना दणका 
इकडे सुरेश धस यांच्या विरोधातील वातावरण गढूळ झालेले असताना आमदार जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी देखील जोर का झटका दिला आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात लढून देखील संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. विशेष म्हणजे जयदत्त व भारतभूषण या काकांचा विरोध असताना अजित पवारांनी पुतण्याला बळ देत एकाच दगडात दोन पक्षी मारले.

सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक सदस्यांची जमवाजमव करण्याची तयारी दाखवून देखील अजित पवारांनी संदीप यांना जवळ केल्याने काका दुखावले गेले. या नेक कामात देखील मुंडे-पंडित जोडी आघाडीवर होतीच. सभापती निवडीच्या वेळी संदीप क्षीरसागर यांना अधिकार देणारा व्हीप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी काढला. पण त्या आधीच जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी शिवसंग्रामला मदत करण्याचा काढलेला व्हीप सदस्यांनी बजावला होता. या दोन घटनांवरुन जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना शह देण्याचे काम इमाने-इतबारे सुरु असल्याचे स्पष्ट होते. 
घड्याळाच्या मदतीला धनुष्यबाण 
राष्ट्रवादीतील कुरघोडीच्या राजकारणाचा फटका जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेला बसू नये याची काळजी देखील वाहिली जात आहे. त्याच एक भाग म्हणून सत्ता स्थापनेच्या पालखीचे भोई म्हणून शिवसेनेला गळ घालण्यात आली आहे. सेनेने देखील राष्ट्रवादीला साथ देण्याचे वचन दिले आहे. मुंबईत अजित पवार आणि शिवसेनेचे बदामराव पंडित यांच्यामध्ये याबाबतची बोलणी झाली असून त्याबदल्यात सेनेला सत्तेतील वाटा देखील देण्याचा शब्द देण्यात आला आहे. 
मुंडेंचे नेतृत्व होणार बळकट 
राष्ट्रवादीत प्रवेश केल्याकेल्याच लागलेल्या मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यानंतर विधानसभेत देखील त्यांना हार पत्करावी लागली होती. पण राष्ट्रवादीने त्यांना प्रमोशन देत मागच्या दाराने आधी आमदारकी आणि नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. पण, जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले नव्हते.

पण नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नेतृत्व सिद्ध करण्याची चालून आलेली संधी मुंडे यांनी कॅश केली आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले. प्रकाश सोळंके यांच्या पत्नीला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्याने त्यांना आता इतर राजकारणात फारसा रस उरलेला नाही.

दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांना सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून दूर लोटत सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची धनंजय मुंडे यांचा खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकताच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला देखील जिल्ह्यात बळकटी मिळेल असे जाणकारांचे मत आहे. 

संबंधित लेख