Beed loksabha politics NCP in search of candidates | Sarkarnama

राष्ट्रवादीकडून बीड लोकसभा लढविलेले चारही उमेदवार भाजपात, आता पाचव्याचा शोध 

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेला उमेदवार पुढे भाजपमध्ये जातो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पक्ष स्थापनेच्या चार लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली तर ते स्पष्ट होते. राधाकृष्ण होके पाटील, जयसिंगराव गायकवाड, सुरेश धस (भाजपच्या जवळ) व रमेश आडसकर हे राष्ट्रवादीकडून बीड लोकसभा लढवलेले चारही उमेदवार आज भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. 

बीड : राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेला उमेदवार पुढे भाजपमध्ये जातो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पक्ष स्थापनेच्या चार लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली तर ते स्पष्ट होते. राधाकृष्ण होके पाटील, जयसिंगराव गायकवाड, सुरेश धस (भाजपच्या जवळ) व रमेश आडसकर हे राष्ट्रवादीकडून बीड लोकसभा लढवलेले चारही उमेदवार आज भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. पण, एकमेकांच्या पायात पाय घालण्याची वृत्ती आणि त्याला वरिष्ठ पातळीवरुन मिळालेले बळ यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक अपवाद वगळता कायम आसमान पहावे लागले. लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करुन आपल्या विधानसभेचा मार्ग सुकर करण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही नेत्याकडून सातत्याने केली गेली. 

पण 2014 मध्ये ही खेळी राष्ट्रवादीवरच उलटली. लोकसभेला भाजपचे दिवंगत गोपीनाथराव मुंडे सव्वा लाख मतांनी विजयी झाल्यानंतर सहाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा पैकी केवळ बीडचा अपवाद वगळता इतर पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. 

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत पुण्यानंतर त्यांना पाठबळ देणारा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते. शरद पवारांनी सुरुवातीला कॉंग्रेसमधून बाहेर पडत स्थापन केलेल्या समाजवादी कॉंग्रेस पक्षालाही जोरदार साथ देत विधानसभेच्या त्यावेळच्या सातही जागा त्यांच्या पारड्यात टाकल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतरही जिल्ह्याने पक्षाला भक्कम साथ दिली. कॉंग्रेसी विचाराधारे इतकाच वैयक्तीक शरद पवारांना माणनारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. 

अलिकडच्या काळात पक्षात जुन्यांना लाथाळ्या आणि नव्यांना पायघड्या असे चित्र आहे. त्यामुळे सुरळीत असलेली गाडी नव्यांना पक्षात घेतल्याने घसरते आणि पक्षांतर्गत पाय ओढणीचा खेळ सुरु होतो.  त्यामुळे नव्याचे स्वागत करतांनाच पक्षातला ताकदीचा माणूस दुसऱ्या पक्षात जातो याकडे पक्ष अजूनही गांभीर्याने पहायला तयार नाही. पक्ष स्थापनेनंतरच्या 18 वर्षातही हे चित्र बदललेले नाही. 

आगामी लोकसभेचा विचार केला तर जिल्हाभरात राबता असलेला उमेदवार राष्ट्रवादीला अद्यापही शोधता आलेला नाही. त्यामुळे पक्ष स्थापनेनंतरच्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ एकदाच राष्ट्रवादीला यशाचा झेंडा फडकता आला. पक्षातून बाहेर पडणाऱ्यांच्या यादीत लोकसभा लढविलेले राधाकृष्ण होके, जयसिंगराव गायकवाड, सुरेश धस व रमेश आडसकर या चौघांचा समावेश आहे. धस यांचा अधिकृत भाजप प्रवेश झालेला नसला तरी ते राष्ट्रवादीतही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 

1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण होके पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मात्र, त्यांना भाजपचे उमेदवार जयसिंगराव गायकवाड यांच्याकडून पराभवाची धुळ चाखावी लागली. पवार निष्ठ असलेले होके पाटील राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही पवारांसोबत राहिले. पण लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघ खुणावत होता. पण, 'नवे ते राष्ट्रवादीला हवे' या सुत्राप्रमाणे ऐनवेळी पक्षात आलेल्या बाजीराव जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी राधाकृष्ण होकेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपची पायरी चढली. 

कालांतराने जयसिंगराव गायकवाडच राष्ट्रवादीत आले आणि त्यांनी राष्ट्रवादीला जिल्ह्यातला पहिला लोकसभा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रकाश सोळंके हे भाजपचे उमेदवार होते. पुढे या दोघांमध्येही जणू अदला- बदल झाली आणि भाजपचे सोळंके राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीचे गायकवाड पुन्हा शिवसेनेमार्गे भाजपमध्ये दाखल झाले. 

2009 च्या दरम्यान  गोपीनाथराव मुंडेंना केंद्रीय पातळीवर काम करण्याचे आदेश श्रेष्ठींनी दिले. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी प्रथमच लोकसभेची निवडणुक लढविली. आपल्या समर्थकांना सहज विजयी करण्याची ताकद असलेले खुद्द गोपीनाथ  मुंडेच लोकसभेच्या मैदानात उतरल्याने उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची चांगलीच दमछाक झाली. 

पक्षाच्या मातब्बरांनी उमेदवारीला नकार दिल्यामुळे राष्ट्रवादीत नवखे असलेले रमेश आडसकर यांना मैदानात उतरवण्यात आले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. पण आडसकर यांनी मातब्बर  मुंडेंना निकराची लढत दिली. पराभूत उमेदवारांत सर्वाधिक मते घेण्याची नोंद त्यांच्या नावावर झाली. पण पुढे रमेश आडसकर यांनीही होके, गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपला जवळ केले. 

2014 मध्ये देशभरात मोदी लाट आली. यावेळी बीडमधून भाजपने गोपीनाथराव मुंडे यांना उमेदवारी दिली. यावेळीही उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीला कसरत करावी लागली. राज्यमंत्री असलेले सुरेश धस यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरवले. पण मोदी लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही आणि अपेक्षेप्रमाणे एक लाख 40 हजार मतांनी मुंडे विजयी झाले. पराभूत सुरशे धस देखील आज भाजपच्या संपर्कात आहेत. 

आता 2019 साठी उमेदवाराचा शोध 

2014 साली झालेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्याने मजबूत बांधणी होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. चुकांचा शोध घेऊन नव्याने चिंतन करुन पक्ष एकसंध केला जाईल, जेष्ठ नेते यात लक्ष घालतील अशी पक्षाच्या सामान्य मतदारांना अपेक्षा होती. पण, मागील एक वर्षापासून पक्ष बांधणी ऐवजी स्वत:च्या गटांचीच जोरकसपणे बांधणी सुरु असल्याचे चित्र आहे. 

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला उमेदवार शोधताना पुन्हा नाकी नऊ येणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना माणनारा वर्ग जिल्ह्यात वाढत आहे. पक्षाच्या मूळ मतदारांसह ते समाजाची काही मते घेऊ शकतील असे आडाखे बांधले जात आहेत. मात्र, त्यांना लोकसभेपेक्षा  परळी विधानसभेत अधिक रस आहे. आजघडीला पक्षासोबत असलेले जयदत्त क्षीरसागर यांचे जिल्हाभर असलेले कार्यकर्त्यांचे जाळे कायम आहे. मात्र, पक्षातील एक गट त्यांना नेहमीच डावलत असल्याने ते नाराज आहेत. आमदार अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत लवकरच संपत असल्याने ते लोकसभेसाठी  इच्छुक असल्याचे राष्ट्रवादीमधील त्यांचे 'हितचिंतक' सांगत आहेत .

संबंधित लेख