Pankaja Munde-Jaydatta Kshirsagar-Dhananjay Munde-Badamrao Pandit
Pankaja Munde-Jaydatta Kshirsagar-Dhananjay Munde-Badamrao Pandit

बीडमध्ये लोकसभेचं गणित : भाजपची बेरीज सुरु पण राष्ट्रवादीची वजाबाकी थांबेना

भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर, शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के आदींना जवळ करण्याचा प्रयत्न होत आहे. तर, राष्ट्रवादीत पक्षांतर्गत गटबाजी संपायला तयार नाही. दोन्ही बाबींचा प्रत्यय याच आठवड्यात आला आहे.

बीड : आगामी तीन चार महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप सर्वाथाने कामाला लागले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच आता विरोधी पक्षातल्यां नेत्यांना भाजपकडून ‘कुरवाळाला’ सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी मात्र विजयी संकल्प मेळाव्याची माहिती देण्याच्या पत्रकार परिषदेतही ‘गटबाजी’चे दर्शन घडवित आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे बेरजेचे गणित सुरु असताना राष्ट्रवादी वजाबाकी थांबवायला तयार नसल्याचे दिसते. भाजप करत असलेली बेरीज ठीक असली तरी ती सुज होऊ नये म्हणजे झाले.

बीड लोकसभा मतदार संघावर १९९६ सर्वप्रथम रजनी पाटील भाजपच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळाला. त्यानंतर पुन्हा दोन वेळा भाजपच्या उमेदवारीवर जयसिंगराव गायकवाड खासदार झाले. २००४ साली जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि लोकसभा लढविली. या निवडणुकीतील जयसिंगराव गायकवाड यांचा एकमेव विजय सोडता राष्ट्रवादीला कायम पराभवच पत्कराला लागलेला आहे. दरम्यान, २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे विजयी झाले. तर, त्यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या. आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि विशेषत: पंकजा मुंडे तयारीला लागल्याचे चित्र अलिकडच्या राजकीय घटनांवरुन दिसते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांना जवळ करण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचे चहापान आणि त्यांच्या गणपतीची आरती, विकास कामांच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी वाढल्यातून ते भाजपमध्ये जातीलच असेही नाही. तरी पण अलिकडे अनेक अनेक व्यासपीठावर आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर एकत्र दिसतात. अगदी जयदत्त क्षीरसागर आणि विनायक मेटे एकमेकांचे कट्टरर विरोधक आहेत. एका कार्यक्रमात मेटेंकडून क्षीरसागरांवर कडाडून टीका झाली. 

याच कार्यक्रमात ‘बारामतीवाल्यांनी आपले आणि जयदत्त अण्णांचे घर फोडले’ असे क्षीरसागरांना सहानुभूती देणारे विधान करुन आपले माप क्षीरसागरांकडे झुकलेले असल्याचे स्पष्ट केले. याची परतफेड म्हणून सहाजिकच जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत ‘सॉफ्ट’ राहतील ते ‘न्यूट्रल’ भूमिका घेतील. तिकडे गेवराईचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या घरी भेट देऊन पंकजा मुंडेंनी ‘डिनर डिप्लोमसी’ही केली. भाजपच्या आमदारांचा मतदार संघ असताना कार्यक्रमावर पुर्णत: शिवसेनेची छाप होती. तसेच पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठीच्या बॅनरबाजीतला उत्साह आणि बदामराव पंडित यांची जवळीकता पाहता कदाचित भविष्यातही शिवसेनेच्या वाघाने भाजप विरोधात कितीही डरकाळ्या फोडल्या तरी गेवराईतली सेना भाजपला सॉफ्टच राहील याची पुर्ण तजवीज पंकजा मुंडेंनी केली आहे. 

माजलगावात भाजप आमदार आर. टी. देशमुख यांच्या कार्यपद्धतीचा फटका पक्षालाही बसू शकतो याचा अंदाज बांधून इथेही ‘पॅचअपच्या’ दृष्टीने त्यांनी पाऊल टाकले आहे. मोहन जगताप यांच्या कोपराला विधानसभा उमेदवारीचा गुळ लावल्याने त्यांच्याही परळी चकरा अधिकच वाढल्या आहेत. तर, बीडमध्ये विनायक मेटे आणि त्यांच्यातील राजकीय संबंधाचा फटका बसू नये म्हणून राजेंद्र मस्केंच्या माध्यमातून नवा पर्याय तयार केला आहे. एकूणच पंकजा मुंडे आगामी लोकसभेचे गणित बिघडू नये यासाठी बेरीज जुळवित आहे. तर, पक्षाच्या स्थापनेपासून झालेल्या पाच निवडणुकांपैकी (पोटनिवडणुकीसह) केवळ एकदा गुलाल उधळायला भेटलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वजाबाकीचे चिन्ह गिरविण्यातच दंग आहेत. 

वजाबाकी करुनही विजय मिळवू हा अतिआत्मविश्वास दोन वेळा नडल्याचे या दिड वर्षात घडले. जिल्हा परिषद आणि लातूर - उस्मानाबाद - बीड याचा प्रत्यय येऊनही सुधारणा होण्याऐवजी गटबाजी आहेच यावर पक्षनेतेच शिक्कामोर्तब करतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे, गेल्या आठवड्यातील पक्षनेत्यांची पत्रकार परिषद. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ता. ३० सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला जिल्हा दौरा आहे. विशेष म्हणजे पवारांचा जिल्ह्यात मुक्काम आणि आगामी निवडणुकीच्या विजयाचा संकल्प मेळावा बीडमध्ये होणार आहे. या पत्रकार परिषदेला पक्षाच्या काही नेत्यांची अनुपस्थिती लपून राहीली नाही. तेवढे कमी की काय, जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीची आरती केली याबातच्या प्रश्नावर ‘बीडमध्ये आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नाही तर राजूरीच्या गणपतीचा आशिर्वाद लागतो’ या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उत्तराने गटबाजी असून त्याला खतपाणीही कमी पडू देणार नाहीत हाच पक्षनेत्यांचा अजेंडा असल्याचे स्पष्ट झाले. तत्पुर्वी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या दौऱ्यातही गटबाजीचे दर्शन घडलेच. 

राष्ट्रवादीला पॅचअपची गरज आणि शक्यही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन मतदार संघात गटबाजी आहे. बीडमध्ये क्षीरसागरांच्या घरातील आणि केजमध्ये मुंदडा विरुद्ध साठे, सोनवणे अशी. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. विजयी होण्याची क्षमता, गटबाजीचे नेमके कारण, नाराजीची कारणे आणि नेमकी चुक कोणाची यावर वरिष्ठांनी लक्ष घालून त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. सध्या वेळ हातातून गेलेला नाही. मात्र, गटबाजीचे घोंगडे असेच भिजत ठेवले तर निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका बसू शकतो. 

भाजपमध्येही बेरीज ठीक, पण सुज येऊ नये
आगामी निवडणुकीचे गणित जुळविण्यासाठी भाजपनेत्यांकडून सध्या बेरीज सुरु आहे. पण, बीडमध्ये मस्केंचे होऊ घातलेले आगमन पक्षातील काही नेत्यांना आतापासून अस्वस्थ करत आहे. तर, गेवराईत शिवसेनेच्या उत्साहाने भाजप कार्यकर्त्यांची अस्वस्था वाढविली. केज, माजलगावमध्येही कमी अधिक अशीच परिस्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com