Beed Lokasbha : Will Badamrao fight or party will file imported candidate ? | Sarkarnama

शिवसेनेकडून बीड लोकसभा बदामराव पंडित लढवणार की इंपोर्टेड उमेदवार ? 

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्युरो  
शुक्रवार, 2 मार्च 2018

स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून आता लोकसभा व विधानसभा लढवणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. नुकतीच शिवसेनेच्या निरीक्षकांनी राज्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पाहणी करून त्याचा अहवाल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

बीड :  स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून आता लोकसभा व विधानसभा लढवणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. नुकतीच शिवसेनेच्या निरीक्षकांनी राज्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पाहणी करून त्याचा अहवाल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित निवडणूक लढवणार की शिवसेनेला उमेदवार आयात करावा लागणार याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

यापुवी भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात बदामराव पंडित राज्यमंत्री होते. अडीअडचणीत तात्काळ मदतीला धावून जाणे, बघतो, करतो अशी भाषा न वापरता तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून काम मार्गी लावणे या त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे गेवराई तालुका आणि जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सहज कुणातही मिसळणारे, बडेजाव  न दाखवता अगदी टपरीवर चहा घेतांना त्यांना अनेकांनी पाहिले आहे. सुख दुःखात मदत, रुग्णांच्या भेटीगाठी यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. 

बदामराव पंडित यांच्या या जनसंपर्क व राजकीय ताकदीवर आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडून बदामराव पंडीत हेच उमेदवार असतील असे बोलले जाते. सद्यस्थितीत बदामराव यांना मात्र दिल्लीपेक्षा गेवराई विधानसभा मतदार संघातच अधिक रस असल्याचे दिसून आले आहे. परंतु ऐनवेळी पक्षाने आदेश दिला तरच ते निवडणुक लढवितील अन्यथा प्रथेप्रमाणे पक्षाला उमेदवार आयात करावा लागेल. 

32 वर्षांपूर्वी (25 एप्रिल 1886 रोजी) रावसाहेब गुजर, अमृत पगारिया, (कै.) विजय बहिर अशा ध्येयवेड्या शिवसैनिकांनी प्रथम पक्षाचा झेंडा जिल्ह्यात रोवला. बघता-बघता शिवसेनचा वाघ जिल्हाभर डरकाळी फोडू लागला. भाजप-शिवसेना युतीच्या काळात पक्षाकडे जिल्ह्यातील सात पैकी चार विधानसभा मतदार संघ असायचे. 1990 ते 2004 हा काळ शिवसेनेसाठी सुवर्णकाळ ठरला होता. 

जिल्ह्यातून बाजीराव जगताप, पुरस्कृत साहेबराव दरेकर, प्रा. सुनिल धांडे हे तिघे आमदार तर प्रा. सुरेश नवले यांना दोन वेळा पक्षाच्या आमदारकीसह राज्यमंत्रीपदाचा मान मिळाला होता. दरम्यानच्या काळात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व राज्यभर विस्तारत हाते. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेकडे असलेले एकेक मतदारसंघ भाजपकडे आणि त्या बदल्यात राज्यातील इतर एखादा मतदारसंघ शिवसेनेला दिला जायचा. त्यामुळे शिवसेना शिवसेना बीड मतदारसंघा पुरतीच मर्यादित झाली. 

त्यामुळे शिवसेनेकडून पद उपभोगलेले अनेक स्थानिक नेते पक्षाला जय महाराष्ट्र करून निघून गेले. यात प्रा. सुनिल धांडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिल्यानंतर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. पण तिथे ते फार काळ रमले नाही आणि पुन्हा शिवसेनेत परतले. पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे. 

पण शिवसेनेची जिल्ह्यातील परिस्थीती काही फारसी सुधारली नाही. गेल्या दहा वर्षात तर अनेक ठिकाणी पक्षाला विजयापेक्षा उमेदवार उभा करता येणे यशापेक्षा अधिक अभिमानाचे वाटायला लागले. 2014 च्या विधानसभा आणि गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवल्या. पण जिल्ह्यात शिवसेनेचे बळ कुठेच दिसले नाही. केज मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कल्पना नरहिरे यांना आयात करावे लागले. समाधानाची बाब म्हणजे त्या शिवसेनेच्याच होत्या. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेकडे सध्या तरी सर्वाधिक राजकीय ताकद असलेले बदामराव पंडित हे एकमेव बीड जिल्ह्यातील नेते ठरतात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या बदामराव यांचे चार समर्थक जिल्हा परिषद सदस्य आहेत. गेवराई पंचायत समितीवरही त्यांचे वर्चस्व आहे. तर, पुत्र युद्धाजित पंडित जिल्हा परिषदेचे सभापती आहेत. 

साधी राहणी असलेल्या बदामराव पंडितांचे कट्ट्यावर आणि टपरीवर बसून चहा पिणे, रुग्णालयात जाऊन रुग्णांची अस्थेवाईक चौकशी किंवा समर्थकासाठी पोलिस ठाण्याची पायरी चढणे या गोष्टी त्यांच्या समर्थकांना भावतात. जेष्ठ चुलतबंधू शिवाजीरराव पंडित यांच्या विरोधात बंड पुकारत विधानसभा निवडणूकीत उडी घेत बदामराव पंडीत यांनी आधी शिवाजीराव आणि त्यानंतर पुतणे अमरसिंह पंडीत यांचा केलेला पराभव गेवराईच्या राजकारणात चांगलाच गाजला होता. या पैकी अमरसिंह पंडीत यांनी एका निवडणूकी बदामराव पंडीत यांना मात देत पराभवाची परतफेड केली होती. 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील बदामराव पंडीत यांना भाजपच्या लक्ष्मण पवार यांच्याकडून 60 हजारांवर मतांनी पराभव पत्करावा लागला होता. पण गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांतून बदामराव पंडीत यांनी जोरदार यश संपादन करत पुनरागमन केले आहे. दरम्यान, शिवाजीराव व अमरसिंह पंडित यांच्या विरोधात त्यांना दोन वेळा भाजप-शिवसेनेने पाठबळ देत पुरस्कृत केले होते.

संबंधित लेख