beed-dhananjay-munde-suresh-dhas-jaydatta-kshirsagar | Sarkarnama

धनंजय मुंडे बोलून गेले आणि सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर समर्थकांनी सुरू केले...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

धनंजय मुंडे यांच्या विरोधात राळ उठवतच सुरेश धस यांनी भाजपचा मार्ग चोखंदळला. तर, मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर पक्षांतर्गत विरोधक आहेत. पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता धस व क्षीरसागर यांच्याबद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वक्तव्य केले होते. 

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या होऊ घातलेल्या जिल्हा दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे विधीमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांच्याबद्दल प्रत्यक्ष अप्रत्य व्यक्तव्य केले. त्यानंतर सुरेश धस यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन तर क्षीरसागर समर्थकांनी सोशल मिडीया व पत्रकातून धनंजय मुंडे यांच्यावर टिकेची झोड सुरु केली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टिकेची झोड उठवत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीपासून दोघेही एकमेकांविरोधात आरोप - प्रत्यारोपाची संधी सोडायला तयार नाहीत. तर, जयदत्त क्षीरसागर यांना डॉमिनेट करण्याची एकही संधी धनंजय मुंडे सोडत नाहीत. त्याचाच प्रत्यय शनिवारी पुन्हा आला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एक ऑक्टोबरला बीडमध्ये पक्षाचा विजयी संकल्प मेळावा होणार आहे. या पत्रकार परिषदेत ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ निवडणुक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा पुर्ण झाला नाही आता होईल का असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारला गेला. यावर पक्षाच्या चिन्हावर विजयी होऊन काही लोकांनी राजकीय व्यभिचार केल्याने (सुरेश धसांनी भाजपला मदत केल्याचा मुद्दा) पक्षाला जिल्हा परिषदेत सत्ता मिळविता आली नाही असा टोला मुंडे यांनी धसांना लगावला. तर, पक्षाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन आणि आरती करण्याने काय प्रसाद मिळेल या प्रश्नावर बीडचा आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नाही तर राजूरीच्या गणपतीचा आशिर्वाद लागतो. राजूरी हे क्षीरसागरांचे गाव आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्याऐवजी संदीप क्षीरसागर यांना आशिर्वाद मिळेल असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. 

मात्र, धनंजय मुंडे बोलून गेल्यानंतर सुरेश धस व जयदत्त क्षीरसागर समर्थकांनीही धनंजय मुंडे यांच्यावर टिकेची झोड उठविली. 

सुरेश धस यांनी लागोलाग पत्रकार परिषद घेऊन ‘ज्यांनी रक्तातल्या नात्यासोबत राजकीय व्यभिचार केला (भाजच्या चिन्हावर निवडुण आलेले नगरसेवक घेऊन धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले होते या संदर्भाने) त्यांनी मला शिकवू नये असा प्रतिटोला लगावला. येवढ्यावरच न थांबता अगोदर जिल्हा बँकेची थकबाकी भरुनच नाक उचलून शेतकऱ्यांबद्दल बोलावे असाही टोला सुरेश धस यांनी लगावला. अगदी धनंजय मुंडे तोडपाणी करण्यात पक्के असल्याचा घणाघातही धसांनी केला. 
धसांचे संपते न संपते तोच जयदत्त क्षीरसागर समर्थकही सोशल मिडीयावर चवताळून उठले. गणपती आशिर्वादाचा मुद्दा पुढे करत राजूरीच्या गणपतीचा आम्हालाच आशिर्वाद आहे. म्हणूनच आम्ही राज्यमंत्री, मंत्री आणि लोकांमधून आमदार झालो. मागच्या दारावाटे (विधान परिषदेवर) गेलो नाहीत अशी टोलेबाजी केली. आता मुंडे याला कसे उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
 

संबंधित लेख