बीड जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेचा मित्रपक्षांनीच केला गेम

एकेकाळी अपवाद वगळता जिल्ह्यात काँग्रेसची एकहाती हुकूमत राहीली. तर, युतीत सुरुवातीला शिवसेना भाजपचा मोठा भाऊ होता. मात्र, आज दोन्ही पक्षांची झालेली कमकुवत अवस्था मित्रपक्षांमुळेच झाली असून मित्रांपुढे हातबल व्हावे लागत आहे.
beed-
beed-

बीड : नव्वदच्या  दशकापर्यंतअपवाद वगळता  जिल्ह्यावर काँग्रेसची एकहाती हुकूमत होती. डाव्या पक्षांनी काँग्रेसला टक्कर देण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. मात्र, काँग्रेसचा गड कायम मजबूत राहीला होता . भाजपचा बहराचा काळ आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडें सारखे  कणखर  नेतृत्व उदयाला आल्यानंतरही काँग्रेस  पक्षाची ताकद होतीच. पण, राष्ट्रवादीच्या उदयानंतर काँग्रेसची फरफट झाली आणि आज जिल्ह्यात काँग्रेस  पक्षाची केविलवाणी अवस्था आहे. तीच स्थिती शिवसेनेची आहे. 

कधी काळी भाजपपेक्षा वरचढ असलेला पक्षाची ही अवस्था  मित्रपक्ष असलेल्या भाजपमुळेच झाली हे विशेष. 

स्वातंत्र्यानंतरही मराठवाडा हैदराबादच्या निझामाच्या राजवटीत होता. निझामाच्या राजवटीतून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या मंडळींची भूमिका महत्वाची राहीली. त्यात बीड जिल्ह्याचे योगदान मोठे होते. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे बीड जिल्ह्यात काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या पक्षांबद्दल आकर्षण होते . सुरुवातीला दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यात समान ताकद राहीली.

 मात्र, डाव्यांचे गड उध्वस्त करण्यात काँग्रेसला यश मिळाले. दरम्यान, १९५२ साली झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत बीडमधून पिपल्स डेमोक्रॅटीक पक्षाचे रामचंद्र परांजपे विजयी झाले. तर, १९६७ आणि ७७ सालच्या निवडणुकांत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अनुक्रमे क्रांतीसिंह नाना पाटील आणि गंगाधरअप्पा बुरांडे विजयी झाले. मात्र, मधल्या दोन निवडणुकांत काँग्रेसनेच आपला झेंडा जिल्ह्यात फडकविला. एकूणच जिल्ह्यात डावे विरुद्ध काँग्रेस असे चित्र होते. पण, डाव्यांना आपला गड शाबित ठेवता आले नाहीत. 

हळुहळू बीड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला. ९० चे दशक उजडेपर्यंत अपवाद वगळता जिल्ह्यावर काँग्रेसची एकहाती हुकूमत राहीली. जेष्ठ नेते शरद पवारांच्या विचारांना आणि कुधी शंकरराव चव्हाणांच्या विचारांना मानणारी मंडळी विजयी होत. 

यानंतर दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व बहरु लागले आणि जिल्ह्यात भाजपने पाय रोवायला सुरुवात केली. भाजपचे कमळ फुलत असले तरी काँग्रेसच्या पंजातले बळ कायम होते. पण, १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. शरद पवार यांच्या विचारांना मानणारे शिवाजीराव पंडित, दिवंगत केशरबाई क्षीरसागर हे मात्तब्बर काँग्रेसी नेत्यांनी शरद पवारांची साथ दिली. तर, मतदार संघात ताकद ठेवून असलेल्यांपैकी डॉ. विमल मुंदडांसारखे नेत्यांनीही शरद पवार यांचाच विचार मानला.

 काँग्रेसमध्ये मात्र रजनी पाटील, बाबुराव आडसकर यांच्यासारखी मोजकीच मंडळी राहीली. या दोघांचे कार्यक्षेत्र आणि ताकद असलेला केज मतदार संघ राखीव होता. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीत पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पुढच्या दोन निवडणुकांत आघाडीत पक्षाला एकमेव परळी मतदार संघावर बोळवण झाली. त्यातही पक्षाचे उमेदवार दम धरु शकले नाहीत.

 पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता असली तरी जिल्ह्यातील सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडेच राहील्या. राज्यात सत्तेत वाटेकरी असलेल्या पक्षाला जिल्ह्यात काही हाती येत नव्हते. अगदी स्थानिक निवडणुकांतही मोठा भाऊ झालेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसची कायम परवडच केली. पक्षाने जिल्ह्यातील म्हणून राम पंडागळे, एम. एम. शेख यांना विधान परिषद दिली खरी. पण, जिल्ह्याचा आणि त्यांचा संबंध काय, हा आजही संशोधनाचा विषय आहे. 

त्यामुळे आडसकरांसारख्यांनाही राष्ट्रवादीचा विचार मान्य करण्याशिवाय गत्यंतर राहीले नाही. आघाडीत पक्षाच्या वाट्याला एकमेव असलेली परळीची जागाही आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे राष्ट्रवादीकडे गेल्यास काँग्रेसच्या ‘हातात’ काय, असा प्रश्न आहे. 

तसाच प्रकार शिवसेनेबाबत भाजपमुळे घडला. भाजप - शिवसेना यांच्यातील सुरुवातीला युतीच्या काळात जिल्ह्यात शिवसेना हा भाजपचा मोठा भाऊ मानला जाई. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा तरुणवर्ग पक्षाला जोडला जाऊन जिल्हाभर संघटन झाले. जिल्ह्यातील सात पैकी चार जागा शिवसेनेकडे तर तीन जागा लहान भाऊ म्हणून भाजपकडे असत. पक्षाच्या चिन्हावर आणि पाठींब्यावर माजलगावमधून बाजीराव जगताप, आष्टीतून साहेबराव दरेकर व गेवराईतून बदामराव पंडित यांनी विजय मिळविला. बीडमधून प्रा. सुरेश नवले, प्रा. सुनिल धांडे आदींनी पक्षाचे झेंडे फडकविले. प्रा. नवले यांना पक्षाने मंत्रीमंडळातही स्थान दिले. 

मात्र, भाजपमध्ये आणि राज्यात दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व बहरत असल्याने जिल्ह्यावर त्यांना एकहाती वर्चस्व हवे होते. त्यामुळे वाटाघाटीत राज्यातील इतर एखादा मतदार शिवसेनेला देऊन जिल्ह्यातील शिवसेनेचा एकेक मतदार संघ भाजपकडे घेण्याचा फॉर्म्युला  वापरला . असे करुन जिल्हाभर ताकद असलेली शिवसेना बीड मतदार संघापुरती मर्यादीत केली गेली. 

युतीत राज्यात मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेची अवस्था जिल्ह्यात लहान भाऊ नव्हे तर एखाद्या सावत्र भावाप्रमाणे झाली. एकमेवर बीड मतदार संघ राहीलेल्या शिवसेनेवही भाजपचेच नियंत्रण झाले. विशेष म्हणजे, भाजपच्या प्रेमाखातर पक्ष जिल्ह्यात कमकुवत असल्याचे शिवसेना नेतृत्वाला उमगायला इतका उशिर झाला की  सर्व पाणी बिंदुसरा पुलाखालुन वाहून गेले होते. 

पक्षाचे आमदार असले तरी युतीत केवळ बीड मतदार संघच पक्षाकडे असल्याने त्यांनीही कायम बीडपुरताच विचार केला. तर, स्थानिक निवडणुकांतही भाजप - शिवसेनेची राज्यभर युती असली तरी जिल्ह्यात हे चित्र वेगळे असे. भाजपच्या सोयीनुसार शिवसेनेला जागा सोडल्या जाईत. त्यामुळे इतर ठिकाणचा पक्षाला मानणारा वर्ग शिवसैनिक पक्षापासून दुरावू लागला.

या सर्व कारणांनी कधीकाळी भाजपपेक्षा वरचढ असलेल्या पक्षाची ताकद सिमिती झाली आणि मागच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेल्या पक्षाला उमेदवार शोधताना नाकी नऊ आले. केजमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कल्पना नरहीरे यांना उमेदवार म्हणून आणावे लागले. आताही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व जागांवर भगवा फडकविण्याची गर्जना केली असली तरी लोकसभेसह काही विधानसभा मतदार संघात उमेदवार शोधताना पक्षाला कसरत करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com