beed-bheemrao-dhonde-devendra-fadanvis | Sarkarnama

मराठा समाजाला न्याय द्या; मेगा भरती तूर्त थांबवा : भाजप आमदार धोंडे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

परळी येथिल ठिय्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा येथेही दोन दिवस ठिय्या आंदोलन आणि मुंडन करून मुख्यमंत्र्यांना केशार्पण केले. या आंदोलकांची भीमराव धोंडे यांनी भेट घेतली. 

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार करणार असलेली मेगा भरती थांबवावी. समाजाच्या भावना समजून घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार भीमराव धोंडे यांनी केली.

याबाबत धोंडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे परळी येथे बुधवारी राज्यातला पहिला ठोक मोर्चा निघाला. ठोस आणि लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी परळीत मांडलेला ठिय्या सहाव्या दिवशीही सुरू आहे.

या आंदोलनाची धग राज्यभर पसरली असून जिल्ह्यातही आंदोलनाचा चांगलाच भडका उडाला आहे. बस वर दगडफेक, जागोजाग रस्ता रोको, बंद, ठिय्या, धरणे अशी आंदोलने सुरू आहेत. पाटोदा येथे क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत मुंडन करून त्यांच्या फोटोला केशार्पण केले. 

चार दिवस चाललेल्या ठिय्याला आमदार भीमराव धोंडे यांनी भेट देऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मेगा भरती थांबवावी अशी मागणी केली आहे. मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन त्यावर सहानुभूती पूर्वक विचार करावा असेही पत्रात म्हटले आहे.

संबंधित लेख