beed-akshay-mundada-ajit-pawar | Sarkarnama

अक्षय मुंदडा मात्र आपले नेते अजित पवारांनाच भेटले

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

जिल्ह्यातील नेत्यांची सध्या स्वपक्षीयांपेक्षा इतर पक्षिय नेत्यांच्या भेटींची स्पर्धा सुरु आहे. जयदत्त क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या घरी गेले. तर, पंकजा मुंडे शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के आणि शिवसेनेचे बदामराव पंडित यांच्या घरी गेल्या. याच्या राजकीय चर्चा जोरात सुरु आहेत. 

बीड : जिल्ह्यात सध्या पक्षाच्या नेत्यांपेक्षा इतर पक्षिय नेत्यांच्या भेटीगाठींचा अधिकच जोर आहे. यामागे भाजपच्या बेरजेच्या राजकारणाचाही भाग आहे. गणपतीच्या आरतींच्या निमित्ताने नेते इतर पक्षियांच्या घरी जात आहेत. मात्र, या अशा विरोधाभासाच्या राजकीय चित्रात अक्षय मुंदडा यांनी सोमवारी पक्षाचे नेते अजित पवार भेट घेतली. 

या भेटीचे फोटो त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. एखाद्या पुढाऱ्याने पक्षाच्या बड्या नेत्याला भेटण्यापेक्षा दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटण्याचीच राजकीय चर्चा अधिक होते. एखाद्या बड्या नेत्याने स्वपक्षाच्या पुढाऱ्यांच्या घरी भेट देणेही अप्रुप आणि राजकीय चर्चेचा विषय होतो. जिल्ह्यात सध्या राजकीय विरोधाभासाचे चित्र आहे. यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचे बेरजेचे राजकारणही आहेच. 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीची आरती केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या गणपतीचेही दर्शन घेतले. याची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. यातच सोमवारी पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीची आरती केली आणि नाष्टाही घेतला. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होऊन राजकीय चर्चा सुरु असतानाच पुन्हा पंकजा मुंडे यांनी गेवराईत शिवसेनेचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या घरी दुपारचे जेवण घेतले. विशेष म्हणजे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार भाजपचे आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधान आले. 

या सर्व घडामोडींत राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी आपलेच नेते अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पक्षाच्या कार्यालयात दोघांमध्ये अर्धा तासावर चर्चाही झाल्याची माहिती आहे. केज विधानसभा मतदार संघातील सद्यस्थिती आणि तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकी बाबतही काही बोलणे झाल्याची सुत्रांची माहिती आहे. अक्षय मुंदडा यांच्या आई दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघाचे पाच वेळा नेतृत्व केलेले आहे. दिवंगत डॉ. मुंदडा भाजपमध्ये असताना आणि राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले होते. श्री. पवार यांच्या त्या विश्वासू नेत्यांमधील एक होत्या. शरद पवार, खासदार सुप्रिया  सुळे यांनी मुंदडांच्या घरी मुक्कामही केलेला आहे. 
मतदार संघात अक्षय मुंदडा आणि त्यांचे वडिल नंदकिशोर मुंदडा जोरदार संपर्क ठेवून आहेत. याची माहीतीही मुंदडांनी दिल्याची माहिती आहे.

संबंधित लेख