baramati politics in new mode | Sarkarnama

अजितदादांचे काकडेंशी मनोमीलन; तावरेंशी तू तू मेैं मैं....!

कल्याण पाचंगणे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पवार विरोधक म्हणून ओळखले जाणारे काकडे यांच्यासारखी जुनी घराणी व पवार कुटुंबीय यांच्यात मनोमिलन होताना दिसून येत आहे. माळेगावात मात्र नेमकी उलटी स्थिती आहे. येथे तावरे व पवार यांच्यात सातत्याने तू तू...मैं मैं होत असल्याने येथील राजकारण अलिकडच्या काळात पूर्णतः ढवळून निघाले आहे.

माळेगाव : सोमेश्वरनगर येथील कार्यक्रमात शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मनोमिलनाचे दृष्य उपस्थितांनी पाहिल्याने साखर पट्ट्यात बदलत्या राजकारणाची नांदी स्पष्ट झाली.

अजितदादांनी पुन्हा येताना मुख्यमंत्री म्हणून हेलिकॉप्टरने यावे आणि स्वागत करण्याची पहिली संधी मला मिळावी, अशी अपेक्षा सतीश काकडे यांनी व्यक्त केली. तर सतीशराव, तुमची माझी मत वेगळी असतील, परंतु राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वसामान्य माणासाठी आपण काम करू, अशा शब्दात पवार यांनी काकडेंच्या भूमिकेला प्रतिसाद दिला. त्यामुळे काकडे यांच्यासारखी जुनी राजघराणी व पवार कुटुंबीय यांच्यात मनोमिलन होताना दिसून येते. मात्र, माळेगावात तावरे व पवार यांच्यात सातत्याने तू तू...मैं मैं होत असल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे.

 
बारामती विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, दूध संघ, सोमेश्वर कारखाना आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजित पवार यांचे वर्चस्व आहे. परंतु माळेगाव साखर कारखान्यामध्ये पवार यांचे विरोधक सत्तेवर आहेत. चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे भाजप नेते कारखाना कार्यक्षेत्रात स्वतःचे अस्तित्व टिकवून आहेत. अर्थात वरील नेते मंडळी शेतकरी मेळावा असोत, की ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ असो, जाहिररित्या पवारांवर सडकून टीका करतात.

माळेगावच्या मोळीच्या कार्यक्रमात (ता. 3) दोन्ही तावरेंनी सरकारमधील तीन मंत्र्यांना कारखान्यावर आणून पवारांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठविली होती. पालकमंत्री गिरिश बापट, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या पवारविरोधी तोफा चांगल्याच धडाडल्या होत्या. ""आगामी निवडणुकीत देशात मोदीसाहेबांचा, तर राज्यात फडणवीस यांचा प्रभाव दिसेल. त्यामुळे बारामतीकरांनी कितीही काळू-बाळू एकत्र करून निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी केली असली तरी आम्ही घाबरत नाही,'', अशा शब्दात मंत्री बापट यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. तसेच पवारांना उद्देशून चंद्रराव तावरे म्हणाले होते, ""कॉंग्रेसच्या राजवटीत 60 वर्षांत झाले नाही, ते मोदी साहेबांनी साखर उद्योग उर्जित आवस्थेत आणण्यासाठी चार वर्षात करून दाखविले.

त्यामुळे अजित पवार मोरगाव येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात चांगले आक्रमक झाले होते. भाजप सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना म्हणजे लबाडाघरचे आवातण आहे. बारामतीत येऊन आमच्यावर टीका करणाऱ्या टिकोजीरावांची औकात आहे का? मोदींच्या लाटेत साधल्याने हे मंत्री स्वतःला मिरवत आहेत, अशा तीव्र शब्दात पवारांनी 

टिकाकारांची औकात काढत पलटवार केले होते. चंद्रराव तावरेंनी बाजपेठेचा आंदाज न घेता माळेगावची साखर निच्चांकी दराने विकली आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे हे कसले `सहकारमहर्षी`? त्यांना लाभार्थी ठेकेदारांच्या कृपने टिनपाट संस्थेकडून सहकारमहर्षी पुरस्कार मिळाला आहे. वास्तविक राष्ट्रीय नेते राहुल गांधी, फारूक अबदुल्ला, चंद्राबाबू नायडूंसारखे दिग्गज नेते पवारसाहेबांचे मार्गदर्शन घेतात. असे असताना पवारसाहेबांवर टिका करताना चंद्रराव तावरेंना पवारसाहेबांच्या नखाची तरी सर येईल का, अशा टोकदार शब्दात अजितदादांनी तावरे यांना फटकारले होते.

नेत्यांच्या आक्रमतेचे सभागृहात पडसाद... 
अजित पवार, चंद्रराव तावरे, रंजन तावरे या नेतेमंडळींमध्ये अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद सध्या माळेगाव कारखान्याच्या सभागृहात पडत आहेत. सत्ताधारी संचालक, बंडखोर संचालक व राष्ट्रवादीचे विरोधी संचालक अशी त्यांच्यात परस्परविरोधी उभी फाटी पडली आहे. निविदा प्रक्रियेच्या मुद्यावरून बाळासाहेब तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्यात झालेली हमरीतुमरी, संचालक मंडळाच्या बैठकीची वेळ पाळत नसल्याने अध्यक्ष रंजन तावरे यांचा 10 संचालकांनी केलेला निषेध ही त्याची उदाहरणे आहेत. 

संबंधित लेख